रेनॉल्टची वाहनेही जानेवारीपासून महाग

फ्रेंच वाहन कंपनी रेनॉल्टने भारतात विकल्या जात असलेल्या त्यांच्या वाहनांच्या किमती येत्या जानेवारीपासून वाढविल्या जाणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीची सबसिडरी असलेली रेनॉल्ट इंडिया, डस्टर व कॉम्पॅक्ट कार पल्स सह पाच मॉडेल्स भारतात विकते.

या संबंधी बोलताना रेनॉल्ट इंडियाचे मार्केटिंग कार्यकारी संचालक सुमित सहानी म्हणाले की कंपनी सध्या भारतीय बाजारात ४.४८ लाख ते २३.९९ लाख रूपये किमतीच्या रेंजमधील वाहने विकते आहे. व्याजदरातील वाढ, उत्पादन खर्चातील वाढ यामुळे वाहनांच्या किंमती वाढविण्याशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही. मात्र किमतीतील वाढ ही औद्योगिक मानकांप्रमाणेच असेल. ही वाढ नक्की किती असेल याची घोषणा लवकरच केली जाणार आहे.

यापूर्वीच निस्सान, टाटा मोटर्स, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, मारूती सुझुकी, हुंडाई, ऑडी, होंडा या कंपन्यांनीही त्यांच्या वाहनांच्या किमती वाढविल्या जात असल्याची घोषणा केली आहे.