हैदराबाद – कॉंग्रेस पक्षाचे आंध्र प्रदेशाचे प्रभारी दिग्विजयसिंग यांच्या हैदराबाद भेटीच्या आधीच सीमांध्रा भागातल्या लोकांनी त्यांच्याबद्दलचा आपला राग व्यक्त करायला सुरुवात केली आहे. काल सीमांध्रा भागातील काही लोकांनी विशेषत: शासकीय कर्मचार्यांनी संघटितपणे निदर्शने करून दिग्विजयसिंग यांच्या प्रतिमेचे दहन केले.
दिग्विजयसिंग हेच सीमांध्रा भागातील राजकारण चुकीच्या दिशेने नेण्यासाठी कारस्थाने करत आहेत, असा या कर्मचार्यांचा आरोप आहे. दरम्यान राष्ट्रपतींनी आंध्र प्रदेशाच्या विभाजनाचा ठराव राज्य विधानसभेकडे विचारार्थ पाठवला आहे. तिथे तो एकमताने मंजूर होणे अपेक्षित आहे. परंतु तसा होण्यात अडचणी येत आहेत.
तिथे ठराव मंजूर होणे तर दूरच, पण आंध्र प्रदेशातल्या कॉंग्रेसच्या खासदारांनी कॉंग्रेस सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मांडला आहे आणि आंध्र प्रदेश विधानसभेत हे विधेयक एकमताने मंजूर होऊ नये यासाठी दुहीचे प्रदर्शन मांडले आहे.
संसदेत मांडण्यात आलेल्या या अविश्वास ठरावाच्या मागे आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांचाच हात असावा असा कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींना संशय आहे. त्यामुळे तर आंध्र प्रदेशाच्या विभाजनाच्या निमित्ताने कॉंग्रेसमधले राजकारण अधिकच गुंतागुंतीचे होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि तेलंगणाची निर्मिती सुखासमाधानाने होणार की नाही असे प्रश्न निर्माण झाले आहेत.