नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गैरटीका करणार्या महिला पत्रकाराच्या विरोधात पोलिसात फिर्याद दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली असून तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. म्हणून तिने अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतला आहे.
या महिला पत्रकाराने २०१२ साली सोशय मीडियामध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केली होती. आता पोलिसांनी तिच्याविरुद्ध फिर्याद नोंदवून साईटच्या संचालकांंशी या महिलेच्या टिप्पणीविषयीचे तपशील मिळविण्यासाठी संपर्क साधला आहे. दोन जमातीमध्ये वैर उत्पन्न करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद या महिलेविरुद्ध दाखल झाली आहे.
नरेंद्र मोदी यांच्या विरुद्धची या महिलेची टिप्पणी वाचून चिडलेल्या पंकजकुमार द्विवेदी या व्यक्तीने या महिलेला काही संदेश पाठवले. त्यांचा आधार घेऊन तिने द्विवेदीच्या विरोधात फिर्याद दाखल केली. मात्र द्विवेदी याने कसलेही आक्षेपार्ह संदेश पाठवलेले नसल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी केवळ या महिलेला मोदी यांच्यासंबंधी उघडपणे चर्चेला तयार रहावे, असा संदेश पाठवला होता. त्यामुळे न्यायालयाने द्विवेदीला निर्दोष ठरवून सोडून दिले.
आता मात्र या महिलेच्या विरोधात पुरावा गोळा करण्याचे काम सुरू आहे आणि तिला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असे पोलीस अधिकार्याचे म्हणणे आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या ६६अ या कलमाखाली तिच्यावर खटला दाखल होणार आहे. तिने मोदींविरुद्ध टिप्पणी करताना लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील असे शब्द वापरले होते.