बँक एटीएम सुरक्षा खर्चाचा बोजा ग्राहकांवर

मुंबई – सर्व बँकांना त्यांच्या देशभर विखुरलेल्या एटीएम ची सुरक्षा वाढविण्याचे आदेश मिळाले असून त्यासाठीची तयारीही बँकांनी सुरू केली आहे. मात्र यासाठी  येणाऱ्या खर्चाचा बोजा ग्राहकांनाच उचलावा लागणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

बंगलोर येथे एटीएम केंद्रात महिलेवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर अनेक राज्यांनी बँकांना एटीएम सुरक्षा कडक करण्याचे आदेश दिले आहेत. कर्नाटक ,तमीळनाडू राज्यांनी हे आदेश त्वरीत दिले तर महाराष्ट्र शासनाने बँकांना एटीएम केंद्रावर सुरक्षेबरोबरच सीसीटिव्ही बसविण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यासाठी बँकांना खर्च येणार आहे व हा खर्च दरमहिना प्रत्येक एटीएम मागे ३६ हजार रूपये असेल असे सांगितले जात आहे. २४ तास सुरक्षा रक्षक आणि सीसीटिव्ही देखभालीचा खर्च यात अंतर्भूत नाही.

अशा परिस्थितीत बँकांनी हा खर्च वसुल करण्यासाठी प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी ग्राहकांकडून घेतल्या जात असलेल्या शुल्कात वाढ करण्याचे ठरविले असून ही वाढ सहा रूपयांपर्यंत असू शकेल.त्याचबरोबर प्रत्येक ग्राहकाला देण्यात येणारी मोफत ट्रान्झॅक्शनची संख्याही कमी केली जाणार असून महिन्याला पाच ट्रान्झॅक्शनच ग्राहकाला मोफत मिळणार आहेत. प्रत्येक एटीएमवर दररोज २०० ट्रान्झॅक्शन होतील असे गृहीत धरून शुल्क वाढ केली गेली आहे असेही समजते. मात्र यासाठी रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे बँकांना आवश्यक ठरणार आहे व त्यानंतरच ही शुल्कवाढ लागू होईल असेही सांगितले जात आहे.