केजरीवाल ठरले जायंट किलर

नवी दिल्ली – भ्रष्टाचारविरोधी मोहिमेतून राजकारणाच्या आखाडयात उतरलेले आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पहिल्याच निवडणुकीत तीनवेळा दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांचा सुमारे 25 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी सन 1967 मध्ये पदार्पणातच मुंबईत काँग्रेसचे मातब्बर नेते स. का. पाटील यांना धूळ चारली होती. त्याच्या आठवणी या निमित्ताने जागृत झाल्या आहेत. फर्नांडिस यांच्याप्रमाणेच केजरीवालही ङ्गजायंट किलरफ ठरले आहेत.

सन 1977 मध्ये लोकसभा निवडणुकीत रायबरेलीमधून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही राज नरैन यांनी असाच पराभव केला होता. कडवे कामगार नेते म्हणून ओळखल्या जाणार्‍या फर्नांडिस यांनी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट अशी ओळख असलेल्या स. का. पाटील यांचा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून दारुण पराभव केला होता. त्यानंतर, त्यांना जायंट किलर ही उपाधी चिकटली. मुंबईचे तीनवेळा महापौर राहिलेल्या पाटील यांनी जवाहरलाल नेहरु, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात मुंबईचे महापौरपद तीनदा भूषविले होते. तीनवेळा खासदार राहिलेल्या पाटील यांचा चौथ्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत फर्नांडिस यांनी आश्‍चर्यकारक पराभव केला होता.

पाटील यांनी प्रचारमोहिमेत ङ्गप्रगती, समुद्धी आणि कार्यक्षमतेसाठी पाटीलफ अशी घोषणा दिली. त्याला फर्नांडिस यांनी ङ्गपाटील पडलेच पाहिजेतफ, ङ्गतुम्ही यांना पाडू शकताफ, अशी घोषणाबाजी प्रत्युत्तरादाखल केली. त्याच धर्तीवर, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी विकासाच्या मुद्यावर आपली प्रचारमोहिम राबविली. तर केजरीवाल यांनी भ्रष्टाचार आणि पारदर्शकतेवर लक्ष्य केंद्रीत केले. परिणामी, नवी दिल्ली मतदारसंघातून पाव लाखापेक्षा अधिक मतांनी दीक्षित यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आम आदमी पक्षाने देशाच्या राजधानीतील राजकीय समीकरणेच बदलून टाकली. पक्षाची स्थापना झाल्यापासून अवघ्या वर्षभरात केजरीवाल यांनी हा प्रचंड विजय मिळवला आहे.

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची हॅटट्रिक साधणार्‍या शीला दीक्षित यांना 25 हजारांहून अधिक मतांनी पराभव करणार्‍या अरविंद केजरीवाल यांचा जन्म हरियानातील हिस्सार येथे 16 ऑगस्ट 1968 रोजी झाला. गोबिंद राम केजरीवाल आणि गीता देवी यांचे पुत्र असलेल्या केजरीवाल यांनी खरगपूर येथील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नालॉजी (आयआयटी) मधून मेकॅनिकल इंजिअरिंगची पदवी संपादन केली. सन 1989 मध्ये त्यांनी टाटा स्टील जॉईन केले. सन 1992 मध्ये राजीनामा दिल्यानंतर 1995 मध्ये त्यांनी नागरी सेवा परीक्षेतून भारतीय महसूल सेवेत प्रवेश केला.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील जनलोकपाल विधेयकादरम्यानच्या आंदोलनावेळी केजरीवाल टीम अण्णाचा भाग होते. जनलोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या सिव्हिल सोसायटीचेही ते एक सदस्य होते. केंद्रावर विश्‍वासघाताचा आरोप केल्यावर काँग्रेस नेते कपिल सिब्बल आणि इतरांनी त्यांना जनलोकपाल विधेयकासाठी राजकारणात प्रवेश करण्याचे आव्हान दिले होते. हे आव्हान स्वीकारत 26 नोंव्हेबर 2012 रोजी केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली होती. केजरीवाल यांचे राजकीय आव्हान काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही लक्षात आले नाही.