राजस्थानची सत्ता पुन्हा एकदा वसुंधरा राजेंच्या हाती

राजस्थान – राजस्थानमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसकडून सत्ता हस्तगत केली आहे. भाजपने राजस्थानमध्ये स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या विजयाचे श्रेय वसुंधरा राजे यांनी मोदींनाही दिले आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत अपेक्षेनुसार भाजपने सत्ता काबिज केली आहे. मात्र, यावेळचे यश हे 2003 च्या यशापेक्षाही दैदिप्यमान असेच आहे. गेल्या वेळच्या तुलनेत भाजपने जवळ जवळ दुप्पट जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला गेल्या वेळच्या तुलनेत निम्म्या जागाही राखता आलेल्या नाहीत.

राजस्थानच्या जनतेने अशोक राज संपुष्टात आणून वसुंधरा राजेंच्या हातात सत्ता दिली आहे. दर पाच वर्षांनी सत्तेत बदल हा राजस्थानच्या जनतेचा स्वभाव राहिलेला आहे. या व्यतिरिक्त अशोक गेहलोत सरकारने पहिल्या चार वर्षांतील निष्क्रीयता पुसण्यासाठी अखेरच्या महिन्यांमध्ये आरोग्याच्या क्षेत्रात अनेक अभिनव योजना सुरू केल्या. मात्र, त्या जनतेच्या पचनी पडल्या नाहीत. रिफायनरी प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचा वादग्रस्त मुद्दाही काँग्रेसला भोवल्याचे दिसत आहे.

मीणा समाजाचे नेते किरोडीलाल मीणा यांनी भाजपविरोधात पुकारलेला यल्गारही काँग्रेसला फायद्याचा ठरलेला नाही तर गुज्जर समाजाचे नेते किरोडीसिंग भैसणा यांनी आरक्षणासाठी काँग्रेसला दिलेला पाठिंबाही काँग्रेसला तारु शकलेला नाही. याची जाणीव ठेवूनच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पराभव मान्य केल्याचे दिसत आहे.
वसुंधरा राजे या चार वर्ष राज्यातून गायब असल्याचा प्रचार काँग्रेसने चालवला होता. मात्र, जनतेने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्‍वास दाखवला आहे. भाजपला प्रस्थापितविरोधी लाटेचा फायदा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

शेतकर्‍यांसाठी 24 तास मोफत वीज पुरवठा, 15 लाख बेरोजगारांना नोकर्‍या आणि गुज्जरांना पाच टक्के आरक्षण हे घोषणापत्रातले मुद्दे जनतेच्या गळी उतरवण्यात भाजप यशस्वी ठरलेला दिसतो. मात्र, राजस्थानच्या भावी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी विजयाचे श्रेय नरेंद्र मोदींना दिले आहे. भाजप आणि वसुंधरा राजेंसाठी सत्तेतून जाणे आणि सत्तेत येणे तसे नवीन नाही. मात्र, त्यांनी यावेळी मिळवलेला विजय राजस्थानमधील भाजपचा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. त्यामुळे पक्षातील वसुंधरांचे वजन तर वाढणारच मात्र मोदींच्याही नेतृत्वाला यामुळे झळाळी येणार यात शंका नाही.

मतमोजणीच्या पहिल्या अर्ध्या तासांत काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची लढत दिसून येत होती. पण कालांतराने भाजपने काँग्रेसवर मोठी आघाडी घेतली. ताज्या निकालांनुसार भाजपने राजस्थानमध्ये प्रचंड बहुमताने सत्ता हस्तगत केली आहे. राज्यात काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रभान यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा दिला आहे. वसुंधरा राजे 13 डिसेंबरला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. पूर्वीच्या कार्यकाळातही तिथेच शपथविधी पार पडला होता.
राज्यात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली आहे. दुसरीकडे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही पराभव स्वीकारला आहे. त्यांनी राजस्थानमधील पराभवास युपीए सरकारच्या धोरणास जबाबदार ठरवले आहे. वसुंधरा राजे यांनी पक्षाच्या विजयाचे श्रेय नरेंद्र मोदी यांना दिले आहे. वसुंधरा यांनी झालरापाटन मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे.

दुसरीकडे वसुंधरा राजे यांनी विजयाचे श्रेय जनतेला दिले आहे. झालरापाटन मतदारसंघातून वसुंधराराजे सिंधिया यांनी काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी यांचा पराभव केला. राजस्थानच्या संभाव्य मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी राज्यातील विजयाचे श्रेय जनतेला समर्पित केले आहे. आपला जनतेवर पूर्वीपासून विश्‍वास होता, असे त्यांनी म्हटले. राजस्थानमधील 199 जागांसाठी मत मोजणी सुरू असून ती दुपारपर्यंत संपेल आणि सर्व निकाल समोर येतील. राजस्थानमध्ये यावेळी 74.38 टक्के पेक्षा जास्त मतदान झाले.

गेल्या विधानसभा निवडणूकीत राज्यात 66.41 टक्के मतदान झाले होते. तर वर्ष 2003मध्ये 67.04 टक्के मतदान झाले होते. राजस्थानमध्ये 199 जागांवर 2096 उमेदवार नशीब आजमावत आहे. राजस्थानमध्ये एकूण 200 जागा असून बसपा उमेदवाराच्या मृत्यूमुळे एका जागेवर निवडणूक झाली नाही. राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाने जबरदस्त मुसंडी मारली असून सत्ताधारी काँग्रेस पक्षाला पराभवाची चव चाखावी लागणार आहे.