मंडेलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ओबामा जाणार

वॉशिग्टन – दक्षिण आफ्रिकेचे महान नेते आणि माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा फर्स्ट लेडी मिशेल ओबामांसह पुढील आठवड्यात आफ्रिकेला जाणार आहेत. तेथे ते मंडेला यांना मानवंदना देतील आणि १५ डिसेंबरला होणार्‍या अंत्यविधी कार्यक्रमात सहभागी होतील असे व्हाईट हाऊस प्रवक्ते जे कार्नी यांनी जाहीर केले आहे.

ओबामा यांनी त्यांच्या एअरफोर्स वन विमानातून माजी अध्यक्ष जॉर्ज डल्ब्यू बुश व त्यांच्या पत्नी लॉरा यांनाही समवेत येण्याचे आमंत्रण दिले आहे व बुश यांनी ते स्वीकारले आहे. जॉर्ज बुश यांचे वडील माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांनाही समेवत येण्याचे निमंत्रण ओबामा यांनी दिले होते मात्र प्रकृतीच्या कारणास्तव सिनिअर बुश अफ्रिकेला जाणार नाहीत असेही सांगितले गेले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनीही मंडेला यांना मानवंदना देण्यासाठी सहकुटुंब दक्षिण आफ्रिकेला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मंडेला यांच्या स्मरणार्थ मंगळवारी श्रद्धांजली सभेचे आयोजन केले आहे त्याला हे सर्व माजी राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. मात्र बिल आणि हिलरी किलंटन ओबामांसोबतच जाणार का स्वतंत्रपणे जाणार हे समजू शकलेले नाही.