पणजी- तेहलका संपादक तरूण तेजपाल यांनी गोव्यातील पंचतारांकित हॉटेलात सहकारी महिला पत्रकाराचे लैगिक शोषण केल्या प्रकरणात या घटनेचे साक्षीदार असलेल्या तेहलकातच काम करणार्या इशान तानखा, जी. विष्णू व शौगत दासगुप्ता या तिघांचा जबाब गोवा पोलिसांनी ज्युडिशिअर मेजिस्ट्रेट समोर शुक्रवारी सायंकाळी नोंदविला असल्याचे समजते.
तेजपाल यांनी लिफ्टमध्ये संबंधित महिलेला खेचून तिथे तिच्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. घटना घडली तेव्हा वरील तिघेजण तिथे उपस्थित होते म्हणून त्यांचा जबाब नोंदविला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घटना घडल्यानंतर या तिघांनीही तेहलकाच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे असेही समजते. तेहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांचाही या आठवड्यात जबाब नोंदविला जाणार आहे.
नोव्हेंबर ७ आणि ८ तारखेला तेजपाल यांनी पत्रकार महिलेचे लैंगिक शोषण केले होते व त्याची कबुली २० नोव्हेंबरला दिली होती. त्याचवेळी महिलेने केलेले आरोप मान्य करून त्यानी संपादकपद सहा महिन्यांसाठी सोडल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर संबंधित वृत्तपत्रावर टीकेचा भडिमार झाला होता.२२ नोव्हेंबरला गोवा पोलिसांनी तरूण तेजपाल यांच्यावर रेप केस फाईल केली आहे.