अण्णांचे १० डिसेंबरपासून राळेगणमध्येच उपोषण

पुणे –  ज्येष्ठ समाजसेवक व लोकपाल विधेयकासाठी जनआंदोलन पुकारणारे अण्णा हजारे येत्या १० डिसेंबरपासून आमरण उपोषण सुरू करणार आहेत. अण्णा त्यांच्या गांवी म्हणजे राळेगणसिद्धीतच उपोषणास बसणार आहेत. अण्णांची तब्येत बरी नसल्याने दिल्ली ऐवजी राळेगणमध्येच उपोषण केले जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

जनलोकपाल विधेयक संसदेत आणले नाही तर हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशीपासून पुन्हा दिल्लीत आमरण उपोषण करण्याची घोषणा अण्णांनी केली होती.जनतेला दिलेला शब्द पाळणार असल्याचे अण्णा यावेळी म्हणाले. जनलोकपाल आंदोलनात जमविण्यात आलेल्या निधीचा गैरवापर केला जात आहे का असे विचारले असता अण्णांनी आंदोलनादारम्यान जमलेल्या निधीतील पाच रूपयांनाही आपण शिवलो नसल्याचे सांगितले. या आंदोलनात सुमारे ३ कोटी रूपयांचा निधी गोळा झाला आणि निधी गोळा करताना आपल्या नावाचा दुरूपयोग केला गेला. त्याला आम आदमी पक्षाचे केजरीवाल जबाबदार आहेत असेही यावेळी अण्णांनी सांगितले.

निधी गोळा केला आहे तर त्याचा हिशोब जनतेला दिलाच पाहिजे असे सांगून अण्णा म्हणाले की माझे सगळे जीवन पारदर्शी आहे आणि जन्मभर मी पैशापासून दूर राहिलो आहे. त्यामुळे निधीचा हिशोब मला सांगता येणार नाही.