केजरीवाल यांचा मार्ग चुकीचा : अण्णा

नवी दिल्ली – सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना काल पत्रकारांशी बोलताना अरविंद केजरीवाल यांच्याशी असलेले आपले मतभेद लपवता आले नाहीत. अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराच्या निर्मूलनासाठी स्वीकारलेला राजकीय पक्ष स्थापनेचा निर्णय चुकीचा आहे, असे ते म्हणाले. केजरीवाल यांनी राजकीय पक्ष स्थापन केल्यामुळे ते आपल्यापासून दूर गेले. जनलोकपाल विधेयकासाठी संघर्ष करणारा गट विस्कळीत झाला, पण हा गट एकत्रित राहिला असता तर देशाचे चित्र वेगळे झाले असते, असेही अण्णा हजारे म्हणाले.

जनलोकपाल विधेयकाच्या लढ्यासाठी निधी जमा करण्यात आला, मात्र त्या निधीचा हिशोब लागत नाही. या संबंधात काही लोकांनी न्यायालयात धाव घेतली आहे, ही बाब अण्णा हजारे यांच्या लक्षात आणून देण्यात आली तेव्हा, त्या पैशांशी आपला कसलाही संबंध नसल्याचा त्यांनी खुलासा केला. माझे बँकेत खाते नाही, माझ्या आयुष्यात पैशाशी ङ्गार संबंध आलेला नाही, तसा तो आलेला असल्याचा कोणाचा दावा असेल, कोणाचा आरोप असेल तर त्यांनी खुशाल न्यायालयात जावे, आपण न्यायालयाला खुलासा करू असेही अण्णा हजारे म्हणाले.