तुम्ही पकडलेत, मग काय?- नारायणसाईचा पोलिसांना सवाल

नवी दिल्ली – दिल्ली हरियाना सीमेवर पोलिसांनी जेरबंद केल्यानंतरही बलात्काराच्या आरोपांखाली हवा असलेल्या नारायणसाईची गुर्मी अजिबात कमी झाली नसल्याचा अनुभव काल पोलिसांनी घेतला. अगोदर बराच काळ नारायणसाईने पोलिसांनी विचारलेल्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर दिले नाहीच पण अखेरी मीच नारायणसाई आहे. तुम्ही मला पकडलेत मग काय? असा सवालही त्याने केला. त्याचवेळी हसतहसत तो तेथे जमलेल्या समर्थकांना हात हलवून निश्चिंत रहा अशी खूणही करत होता.

नारायण साईला पुढील चौकशीसाठी गुजराथेत नेले जात आहे. मात्र गेले दोन महिने पोलिसांना चकविणारा नारायणसाई कसा रहात होता याची माहितीही पुढे आली आहे. या काळात नारायणने रेल्वे अथवा बसचा वापर न करता खासगी गाड्यांनीच संपूर्ण प्रवास केला. इतकेच नव्हे तर गाडीतच तो खातपित होता. या काळात त्याने कॅम्री, अल्टीस, फॉर्च्युनर, स्विफ्ट डिझायनर, फोर्ड इको स्पोर्ट अशा अनेक गाड्या वापरल्या आणि या गाड्या त्याच्या भक्तांनीच त्याला पुरविल्या होत्या असेही उघडकीस आले आहे.

नारायणसाईला ज्या गाडीत पकडण्यात आले तीही मेरठ येथील एका उद्योगपतीच्या मालकीची आहे. १३० पोलिस गेले दोन महिने सतत नारायण साईच्या पाठलागावर होते आणि गुन्हा अन्वेषण विभाग त्याच्यासंबंधीच्या कुठल्याही खबरीची ताबडतोब दखल घेत होता असेही समजते.