नरसिंग यादव ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी

पुणे- नरसिंग यादवने भोसरी येथे बुधवारी सलग तिस-यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकत इतिहास घडवला. तीनवेळा महाराष्ट्र केसरी हा किताब मिळवणारा तो पहिलाच मल्ल ठरला आहे. पहिल्या फेरीपासून गाजवलेले वर्चस्व अंतिम फेरीतही कायम ठेवत नरसिंगने मुंबईच्याच सुनील साळुंखेचा 8-0 असा पराभव केला. नरसिंगने याआधी 2011मध्ये अकलूज आणि 2012मध्ये गोंदिया येथे झालेल्या महाराष्ट्र केसरीचे जेतेपद पटकवले होते.

या जेतेपदासोबतच नरसिंगने बक्षीस रुपाने असलेली स्कॉर्पियो गाडीही मिळवली. नरसिंग हा एकूण 42वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. नरसिंगने अंतिम फेरीत सुरुवातीपासून सुनीलला विशेष संधी दिली नाही. त्यातच पहिल्या दोन मिनिटांमध्ये सुनील आणि नरसिंग यांच्यात थोडीफार चुरस झाली. नरसिंगने दोनवेळा खाली पडून सुनीलला खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातून सुनीलने स्वत:ला सावरले. मात्र नरसिंगने पुन्हा आक्रमक धोरण कायम ठेवत सुनीलला खाली खेचत पूर्णपणे लोळवले. तेथेच पंचांनी नरसिंगला विजयी घोषित केले.

नरसिंगला विजयी घोषित केल्यावर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. नरसिंग सुरुवातीपासून या हॅटट्रिकसाठी दावेदार मानण्यात येत होता. त्याप्रमाणे त्याचा खेळ प्रत्येक फेरीगणिक सरस होत होता. प्रतिस्पर्ध्याला काही सेकंदात सहज लोळवत नरसिंगने त्याची ताकद दाखवून दिली. वाढवलेले वजन आणि आत्मविश्वास नरसिंगला इतिहास घडवून देऊन गेले. दुसरीकडे, सुनील साळुंखे हा मूळचा सांगलीचा आहे. वस्ताद भारत भोसले यांचा तो पठ्ठा आहे. माती विभागातून आलेला सुनील यंदा अंतिम फेरी गाठेल ही फारशी कोणाला आशा नव्हती.

मात्र माजी महाराष्ट्र केसरी समाधान घोडकेसारख्या मल्लाला उपांत्यपूर्व फेरीत नमवत सुनीलने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता नरसिंगपुढे तो टिकू शकला नाही. मातीत खेळल्यावर त्याला लगेचच मॅटवर जुळवून घेण्यात कठीण गेल्याचे दिसले. उपविजेता ठरल्याने त्याला बुलेट बाइक देण्यात आली.

नरसिंग यंदा जेतेपदाचा प्रमुख दावेदार मानण्यात येत असल्याने त्याच्या लढतींचे सुरुवातीपासून कुस्तीशौकिनांना आकर्षण होते. पहिल्या फेरीपासूनच्या त्याच्या लढतींना मोठी गर्दी होत होती. नरसिंगनेही त्यांना नाराज केले नाही. त्यातच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पहिल्याच फेरीत गारद झाल्यानंतर नरसिंगच्या जिंकण्याच्या आशा उंचावल्या होत्या. भरीसभर म्हणजे मंगळवारी माती गटात समाधान घोडके पराभूत झाल्याने नरसिंगचा मार्ग पूर्ण मोकळा झाला होता.