काश्मीर प्रश्‍नावरून भारत-पाक यांच्यात केव्हाही युद्ध हेाऊ शकते पाकिस्तानी पंतप्रधानांनी दिला इशारा

इस्लामाबाद – काश्मीरचा प्रश्‍न लवकर सुटला पाहिजे अन्यथा या विषयावरून दोन्ही देशांमध्ये केव्हाही चौथे युद्ध होऊ शकते, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिला आहे. भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीरला मुक्त करणे हे आपल्या आयुष्याचे स्वप्न असून आपल्या हयातीतच ते पूर्ण होईल, असा आपला विश्‍वास आहे असे त्यांनी आझाद काश्मीर विधानसभेच्या अंदाजपत्रकीय अधिवेशनात बोलताना सांगितले.

काल रात्री नवाज शरीफ यांचे हे भाषण झाले. त्यांच्या भाषणाच्या संबंधातील निवेदन पाकिस्तान सरकारने काल रात्री प्रसिद्धीला दिले आहे; परंतु त्यात त्यांनी काश्मीर प्रश्‍नावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध उद्भवेल असे जे विधान केले आहे त्याचा उल्लेख टाळण्यात आला आहे. काश्मिरी जनतेच्या अपेक्षा आणि संयुक्त राष्ट्रांनी केलेला शांतताविषयक ठराव या मुद्द्यावरून काश्मीरचा प्रश्‍न सोडवला पाहिजे. त्याशिवाय तेथे शांतता प्रस्थापित होऊ शकणार नाही, असेहंी त्यांनी म्हटले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंधांबाबत बोलताना ते म्हणाले की भारतामुळेच या दोन देशांमध्ये शस्त्रास्त्र स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यांच्यामुळेच आम्ही या शस्त्रास्त्र स्पर्धेत ओढले गेलो आहोत. पाकव्याप्त काश्मीरबाबत भारताने परस्परविरोधी भूमिका घेतली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला. काश्मीर हा बरेच दिवस प्रलंबित असलेला वाद असून तो शक्य तितक्या लवकर सुटला पाहिजे, अशी पाकिस्तानची इच्छा असून हंी बाब मी स्वतः अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कानावर घातली आहे.

त्यांनीहंी संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या ठरावानुसार हा वाद मिटला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, असे शरीफ यांनी या कार्यक्रमानंतर सर्वपक्षीय हुर्रियत परिषदेच्या नेत्यांशी बोलताना सांगितले. पाकिस्तान सरकार काश्मीरवरील हक्क कधीही सोडणार नाही, असेहंी त्यांनी या नेत्यांशी बोलताना स्पष्ट केले. सद्यःस्थितीत दोन्ही देशांमधील प्रत्यक्ष ताबारेषेवर शांततेचे वातावरण आहे, त्याबद्दल त्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.