दंगलग्रस्तांच्या छावण्यात सामूहिक विवाहाला गती

मुझफ्फ्रनगर – उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फ्रनगर दंगलीतल्या आपद्ग्रस्तांच्या मदत छावण्यात आता विवाहांचे सत्र सुरू झाले असून गेल्या तीन महिन्यांत ७०० विवाह झाले आहेत. या विवाहांत अल्पवयीन मुलींचेही विवाह सरसकट केले गेले आहेत. यातल्या लोई या गावातल्या मदत छावणीत तर १८ ऑक्टोबरला एकाच कुटुंबातल्या नऊ मुलींचे विवाह एकदम लावण्यात आले आहेत.

या लोकांनी सामूहिक विवाह केल्यास त्यांना सरकारतर्ङ्गे एक लाखाची मदत दिली जाते. हे समजल्यावर या छावण्यांत सामूहिक विवाहाचेही कार्यक्रम सुरू झाले आहेत. एकदा लग्न झाले की छावणीत आणि अन्यत्रही लैंगिक अत्याचार होण्याची भीती तर कमी होतेच पण प्रेम प्रकरणेही कमी होतात अशी भावना छावण्यातल्या मुलींच्या पालकांच्या मनात आहे. त्यातच मुख्यमंत्री निधीतून एक लाख रुपये मिळतात हे आकर्षण आहेच.

कांधला छावणीत ४०० मुलींचे विवाह झाले आहेत तर शहापूर मध्ये १६० मुली विवाहबद्ध झाल्या आहेत. जमाते उलेमा ए हिंेद या संघटनेचे कार्यकर्ते या लग्नांच्या बाबतीत पुढाकार घेत आहेत. आता सरकारी अधिकार्‍यांनी याबाबत खुलासा केला असून मुख्यमंत्री निधीतली एक लाखाची मदत केवळ सात नवविवाहित दांपत्यांना दिली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही मदत केवळ लाक्षणिक आहे, ती सरसकट सर्वांना दिली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.