जेरूसलेम- इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू जनतेकडून कर रूपाने वसूल केलेल्या पैशांतून आलिशान राहणी उपभोगत असल्याचे माहिती हक्क अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार उघड झाले असून त्या विरोधात इस्त्रायली जनतेने तीव्र निषेध नोंदविला आहे. गेली दोन वर्षे इस्त्रायलमध्ये आर्थिक तूट भरून काढण्यासाठी जनतेवरील कर वाढविले गेले आहेत. परिणामी महागाईनेही कहर केला असून लोकांना अतिशय काटकसरीने राहावे लागते आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मात्र मुक्तहस्ते खर्च करत असल्याने ते जनतेच्या टीकेचे धनी बनले आहेत.
माहिती अधिकारातून मिळविलेल्या माहितीनुसार बेंजामिन यांनी २०१२ सालात९०,९००० डॉलर्स खर्च केला असून त्यात २३,३०० डॉलर्स फुलांच्या सजावटीवर, ३१,६०० डॉलर्स बागकामावर, १७०० डॉलर्स सुगंधी मेणबत्यांवर,४१६०० डॉलर्स केटरिंगवर, पाणी बिलापोटी २२००० डॉलर्स, ११,८०० डॉलर्स कपडे धुलाईवर, इलेक्ट्रिीक बिलापोटी ७३९० डॉलर्स खर्च केले असल्याचे उघड झाले आहे. हा सारा खर्च सरकारी निवासस्थानावरील राहणीत केला गेला आहे. परिणामी त्यांना त्यांच्या आवडत्या जेरूसलेम पार्लरमधून आईस्क्रीम खरेदी करण्यासही जनतेने कडाडून विरोध केला आणि त्यांना आईस्क्रीम खरेदी करता आले नाही असेही समजते. बेंजामिन दरवर्षी ३००० डॉलर्स कार्यालयीन उपहारावर खर्च करतात असेही पुढे आले आहे.
सरकारी कार्यालयाने मात्र पंतप्रधानांना देशोदेशीचे पाहुणे, सन्माननीय पाहुणे यांच्या आगतस्वागतासाठी खर्च करावा लागतो असे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र देशाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगून सर्वसामान्यांच्यासाठी असलेल्या आरोग्य योजना, शिक्षण, कल्याणकारी योजना, सुरक्षा व्यवस्था यांना कात्री लावली गेली असल्याने जनतेत असंतोष पसरला आहे.