औरंगाबाद – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर तातडीने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा अध्यादेश शासनाने जारी केला. त्यावर येत्या नागपूर अधिवेशनात शिक्कामोर्तब करून कायद्यात रूपांतर केले जाणार आहे. या अधिवेशनात याच कायद्याला प्राधान्य असणार असल्याचे संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
पाटील आज औरंगाबाद दौर्यावर आहेत. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यासंबंधित पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी सर्व संसदीय आयुधांचा वापर केला जणार असल्याचे पाटील म्हणाले. पाटील यांच्या उपस्थितीत सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यालाही ते उपस्थित राहिले. राज्यात सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात रुजली असून सहकार क्षेत्र अधिक मजबूत करण्यासाठी सहकारी संस्थांच्या सभासदांना व संबंधितांना सहकार क्षेत्राविषयी अधिक सखोल मार्गदर्शनासाठी अद्ययावत राज्य शिखर प्रशिक्षण संस्था उभारण्यात येणार असल्याचे सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यमंदिर येथे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या सभासदांना 97 व्या घटनादुरुस्तीनुसार सुधारित सहकार कायद्याची माहिती करून देण्यासाठी सहकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, सहकार व पणन राज्यमंत्री सुरेश धस, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शारदाताई जारवाल, जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आशाताई भुतेकर,आमदार डॉ. कल्याण काळे, आमदार सुभाष झांबड, सहकार आयुक्त मधुकर चौधरी, विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रम कुमार, अंकुशराव टोपे तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.