विशेष दर्जाने काश्मीरला काय मिळाले ?

जम्मू – भारतीय राज्यघटनेने जम्मू-काश्मीरला ३७० व्या कलमाने दिलेल्या विशेष अधिकाराचा नेमका काय ङ्गायदा झाला याचा एकदा विचार केला पाहिजे आणि तसा ङ्गायदा झाला असेल तरच ते कलम जारी ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी काल जम्मू येथील जाहीर सभेत बोलताना केले.

जम्मू-काश्मीरला हा विशेष दर्जा दिल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येते. त्यामुळे हे कलम रद्द केले पाहिजे अशी मागणी आजवर भारतीय जनता पार्टीने केलेली आहे. मात्र आता या कलमाचा ङ्गेरविचार करण्याची तयारी भाजपाने दाखवली असल्यामुळे भाजपाचे या बाबतीतले धोरण बदलले असल्याचे सूचित होत आहे.

श्री. नरेंद्र मोदी यांनी जम्मूच्या जाहीर सभेत हा विषय उपस्थित करून तिथल्या मुस्लीम मतदारांची मते जिंकण्याचा प्रयत्न केला आहे असे मानले जाते. या विशेष दर्जाने जम्मू-काश्मीरमधल्या महिलांवर अन्याय होतो असे त्यांनी प्रतिपादन केले. मोदी यांच्या या भूमिकेमुळे कॉंग्रेसचे नेते अस्वस्थ झाले असून त्यांनी मोदींच्या भूमिकेवर टीका करायला सुरुवात केली आहे.