बाहुबलीची सुसाट बुलेट

बॉलिवूडमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करणारे काही मोजकेच दिग्दर्शक आहेत. त्यामध्ये ‘हासील’ पासून आपल्या दिग्दर्शनाची कारकीर्द करणार्‍या तिरमांशु धुलियाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. ‘साहब बिबी और गँगस्टर’, ‘पानसिंग तोमर’ आदी चित्रपटातून त्याने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. ‘बुलेट राजा’द्वारे त्याने पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील सत्तासंघर्ष आणि बाहुबली यावर प्रकाश टाकण्याचा उत्तम प्रयत्न केल आहे. सध्या बॉलिवूडमध्ये थोड्या टपोरी स्टाईलच्या नायकांची चलती आहे, हाच धागा पकडून तिरमांशुने आपल्या नायकाचे सादरीकरण केले आहे.

तिरमांशु धुलियाच्या बुलेट राजाची कथा उत्तर प्रदेशमधील राजकारण आणि तेथे असलेला बाहुबलींचा प्रभाव या भोवती गुंफण्यात आलेली आहे. कथेचा नायक राजामिश्रा (सैफ आली खान) आणि त्याचा मित्र रूद्र (जिमी शेरगील) यांची भेट एका लग्नाच्या वरातीमध्ये होते. राजा आणि रूद्र दोघेही उच्च शिक्षित आहेत. रूद्र पोस्टमनची नोकरी करतोय, तर राजा नोकरीच्या शोधात आहे. रूद्राच्या काकाच्या मुलीच्या लग्नात त्यांच्या घरावर हल्ला होतो त्यावेळी राजा त्यांचे प्राण वाचवतो. मात्र, त्यानंतर ज्याने हल्ला केला होता त्या लल्लनचे (चंकी पांडे) लोक या दोघांच्या जिवावर उठतात, त्यामुळे दोघेही आपला जीव वाचविण्यासाठी त्याच्या काकाच्या सांगण्यावरून जेलमध्ये आश्रय घेतात.

या प्रकरणातून बाहेर पडण्याऐवजी त्यांना बाहुबली होण्याचा सल्ला रूद्रचे काका देतात, तो सल्ला मानत या दोघांची वाटचाल सुपरफास्ट वेगाने होते कारण त्यांना रामप्रसाद शास्त्री (रज बब्बर) या ज्येष्ठ मंत्र्यांचा वरदहस्त लाभला आहे. एका बैठकीत सन्मानाची वागणूक दिल्याने हे दोघे उद्योगपती बजाजवर नाराज होतात आणि सुडापोटी त्याचे अपहरण करतात त्यावेळी त्यांची भेट मिताली (सोनाक्षी सिन्हा) शी होते. मितालीलाही ते बजाज सोबत आणतात. बजाज मग आपल्या अवमानाचा बदला घेण्यासाठी सुमेर यादव (रवी किशन)ची मदत घेतो आणि या बदले की आग मे रूद्रचा मृत्यू होतो. रूद्रच्या मृत्युचा बदला आणि स्वत:चे अस्तित्व दाखवून देण्यासाठी राजा बजाजचा भर दिवसा शहराच्या मध्यवर्ती भागात खून करतो. राजकारण्यांचा कुबेर अशी ओळख असलेल्या बजाजच्या हत्येने खळबळ माजते आणि राजाचा बंदोबस्त करण्यासाठी रामप्रसादवर दबाव येतो. आता राजाचे पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी बुलेट राजा पाहायला हवा.
तिरमांशु धुलियाने आपल्या प्रत्येक चित्रपटातून उत्तर भारतातील सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर प्रभावीपणे भाष्य केलेले आहे, यामुळे बुलेट मधूनही त्याच्याकडून त्या प्रकारच्या अपेक्षा होत्या आणि त्याने काही प्रमाणात का होईना त्या पूर्ण केल्या आहेत.

राजा सुरुवातीला थोडा मजबूर असला तरी ऐंशी, नव्वदच्या दशकातील नायकांप्रमाणे तो मजबुरीच रडगाण गात नाही, नात्यांमध्ये तो भावनिकरित्या गुंतलेला असला तरी त्याच्या भावना त्याला त्याच्या कामापासून प्रवृत्त करत नाहीत यामुळे सैफचा हा राज इतर चित्रपटांपेक्षा आपले वेगळेपण सिद्ध करतो. पटकथेत अनेक पात्रांचा अंतर्भाव असला तरी आपल्याला नेमके काय सादर करायचे आहे याची जाणीव तिरमांशुला असल्याने कुठेही पात्रांचा गोंधळ उडालेला नाही. कथेला साजेसे दमदार संवाद असल्याने प्रेक्षक चित्रपटाशी एकरूप होत जातो.
राजाच्या भूमिकेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न सैफने केला आहे. जिमी शेरगीलच्या वाट्याला छोटी भूमिका असली तरी त्याचा प्रभाव जाणवतो. सोनाक्षी सिन्हाचीची एन्ट्री फार उशिरा होते आणि तिच्या वाट्याला फारसे आलेले नाही. सुमेर यादवच्या भूमिकेत रवी किशन आपले लक्ष वेधून घेतो. साजीद – वाजीदचे संगीत फारसे कर्णमधुर झालेले नाही. अपवाद फक्त तमन्चे पे डिस्को. एकंदरीत कथा नेहमीच्या चित्रपटांसारखी असली तरी तिरमांशु धुलियाने दिलेल्या वेगळ्या ट्रिटमेंटमुळे बुलेट राजा प्रभावी झाल्याने या बुलेटची सवारी करायला हरकत नाही.

चित्रपट – बुलेट राजा
निर्माता, दिग्दर्शक – तिरमांशु धुलिया
संगीत – साजीद – वाजीद
कलाकार – सैफ अली खान, सोनाक्षी सिन्हा, जिमी शेरगील, विद्युत जामवाला, रवी किशन, गुलशन ग्रोव्हर, राज बब्बर आणि चंकी पांडे.