बीजिंग – भारताच्या ईशान्य भागातील अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग असल्याचा दावा पुन्हा एकदा चीनने केला आहे. चीनच्या सरकारी माध्यमातून हा दावा करण्यात आला आहे. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी अरुणाचल प्रदेशाला भेट दिली. परंतु हा चीनचा भाग असल्यामुळे राष्ट्रपतींनी या भागाला भेट द्यायला नको होती असे झिन्हुआ या चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
चीनचे सरकार गेल्या काही वर्षांपासून अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग असल्याचा दावा करत आहे. भारताने या प्रदेशात घुसखोरी करून तो बेकायदारित्या आपल्या ताब्यात ठेवला आहे, असा चीनचा आरोप आहे आणि त्यामुळे हा भारताचा भाग असल्याचे दाखविण्यासाठी भारताने काहीही करू नये, असे चीनकडून नेहमीच सांगितले जात असते.
अरुणाचल प्रदेश हा चीनच्या तिबेटच्या तीन भागांपासून बनलेला आहे, असे चीनचे सरकार म्हणते. मोयुल, लोयुल आणि लोवरसायुल अशा तीन भागांपासून अरुणाचल प्रदेश बनलेला आहे. भारत आणि चीन यांच्या दरम्यान मॅकमोहन रेषा आखलेली आहे. ती रेषा आणि या दोन देशांदरम्यानची सध्याची परंपरागत सीमारेषा या दोन्हीच्या मध्ये हे तीन भाग येतात. त्यामुळे चीनच्या पूर्वेच्या भागात असलेल्या या प्रदेशावरचा चीनचा दावा समर्थनीय आहे, असे चीनचे म्हणणे आहे.