दुबई – समुद्राचे खारे पाणी पिण्यायोग्य बनविण्यासाठीचा शुद्धीकरण प्रकल्प अरब अमिरातीत उभारला जात असून हा जगातील सर्वात मोठा सौर उर्जेवर चालणारा पाणीशुद्धिकरण प्रकल्प असेल. या प्रकल्पाची शुद्धिकरण क्षमता दररोज २२० लाख गॅलन पाणी शुद्ध करण्याची आहे तसेच त्यातून २० मेगावॉटची वीजनिर्मितीही हेाणार आहे. रास अल खैमा इमिरेटस येथे हा प्रकल्प उभारला जात असून त्यात अत्यंत आधुनिक फिल्टरेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.
युटिको मिडल इस्ट या खासगी सोल्यूशन प्रोव्हायडर कंपनीने हा प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले आहे. समुद्री पाण्यातून मीठ व अन्य क्षार बाहेर काढून पाणी शुद्धिकरण करणार्या डिसॅलिनेशन बिझिनेसचे हे उत्तम मॉडेल असल्याचा कंपनीचा दावा आहे. प्रकल्पाची क्षमता खूप असल्याने पाणी शुद्धिकरणासाठी येणारा खर्च कमी होणार आहेच मात्र हा सौर उर्जेवर असल्याने पर्यावरणपूरकही आहे. त्यातून कार्बन उर्त्सजन होणार नाही असे कंपनीचे उपाध्यक्ष रिचर्ड मेनेझेस यांनी सांगितले.
या भागात जवळजवळ वर्षभर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे त्यामुळे ही मोफत उर्जा उपलब्ध आहेच त्याचाच वापर या प्रकल्पासाठी केला जात आहे. सौदी, कुवेत युनायटेड अरब एमिरेटस, कतार, बहारीन व ओमान या सहा अरब देशांची गल्फ को ऑपरेटिव्ह कौन्सिल या प्रकल्पासाठी सहाय्य करणार आहे. या प्रकल्पासाठीच्या निविदा पुढील महिन्यात निघणार आहेत.