तिघांच्या फाशीचे जन्मठेपेत रूपांतर

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटकातल्या शिमोगा जिल्ह्यातील तिघा दरोडेखोरांची फाशीची शिक्षा सौम्य करून तिचे रूपांतर जन्मठेपेत केले. या तीन आरोपींनी टाकलेल्या सशस्त्र दरोड्यामध्ये एका व्यक्तीचा त्यांच्या हातून खून झाला होता आणि उच्च न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.एस. चौहान आणि एस.ए. बोबडे यांच्या खंडपीठाने ती शिक्षा रद्द करून जन्मठेपेत रूपांतरित करताना जन्मठेप हा नियम आहे आणि फाशीची शिक्षा हा अपवाद आहे, असे प्रतिपादन केले.

हा दरोड्याचा प्रकार २००५ सालच्या ऑगस्ट महिन्यामध्ये झाला होता आणि दरोडेखोरांनी चार लाख रुपये चोरल्याचा आरोप होता. या दरोड्याच्यावेळी झालेल्या मारहाणीत मधुसूदन नावाच्या व्यक्तीचा खून झाला होता. या खुनाबद्दल आधी सत्र न्यायालयात आणि नंतर उच्च न्यायालयात या तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली होती. परंतु या दरोडेखोरांनी ङ्गाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या ङ्गाशीचे रूपांंतर जन्मठेपेत केले. ज्या गुन्ह्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा पुरेशी वाटत नाही अशा गंभीर गुन्ह्यातच फाशीची शिक्षा अपरिहार्य असते असे म्हणत हा गुन्हा असा गंभीर नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यांची फाशी रद्द केली.