बेळगाव – गेल्या तीन दिवसांपासून कर्नाटकात उस दरासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा शेवट काल मोठया दुर्दैवी घटनेने झाला. बेळगावातल्या विधानसभेच्या सुवर्ण विधान सौधा समोर काल एका कर्जबाजारी शेतकर्याने विष प्राशन करून आपले जीवन संपवले. या प्रकाराने विधानसभेत आणि राज्यातही संतापाची लाट उसळली. आत्महत्या केलेला शेतकरी बेळगाव जिल्ह्याच्या रायबाग तालुक्यातला आहे. ५५ वर्षे वयाच्या या शेतकर्याचे नाव विठ्ठल भीमप्पा अरभावी असे असून त्याच्यामागे मोठे कुटुंब आहे.
या शेतकर्याने खाजगी सावकाराकडून आठ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. शिवाय मुलीच्या विवाहासाठीही त्याने कर्ज काढले होते. सरकारने उसाला अर्थशास्त्राचा विचार करून दर द्यावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत पण सरकार त्याबाबत चालढकल करीत आहे त्यामुळे तो निराश झाला होता. राज्यात सध्या शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. विधानसभेसमोर धरणे जारी आहे. अरभावी याने काल या शेतकर्यांसमोर भाषण केले. बोलता बोलता तो भावनवश झाला आणि धरण्याच्या तंबूत जाऊन त्याने मोनोक्रोटोङ्गास हे विषारी औषध प्राशन केले.
त्याला अन्य शेतकर्यांनी सरकारी दवाखान्यात दाखल केले पण तो मरण पावला. सुमारे ३०० ते ४०० शेतकरी हा प्रकार पहात होेते. ते ङ्गारच संतप्त झाले आणि त्यांनी सरकारच्या तसेच मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. मुख्यमंत्र्यांनी या प्रकारानंतर विधानसभेत निवेदन करून या शेतकर्याच्या कुटुंबाला दहा लाखाची मदत देण्याची घोषणा केली.