मोदी ठरणार संवत्सर पुरूष

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना जगप्रसिद्ध टाईम या मासिकाच्या संवत्सर पुरुष (पर्सन ऑङ्ग द इयर) ठरविण्यासाठीच्या पहिल्या ४२ जणांमध्ये नामांकन मिळाले आहे. जगभरातील प्रभावी नेत्यांच्या चाहत्यांकडून आलेल्या ऑन लाईन मतांतून त्यांची निवड झाली आहे. या ४२ जणांतून जगातील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तीची निवड केली जाणार असून ती पुढच्या महिन्यात जाहीर होणार आहे.

या ४२ जणांच्या यादीमध्ये जपानचे पंतप्रधान शिंझो अबे, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, पाकिस्तानची युवा सामाजिक कार्यकर्ती मलाला युसूङ्गझाई तसेच अमेरिकेच्या कथित गोपनीयतेचा गौप्यस्ङ्गोट करणारा तरुण कार्यकर्ता एडवर्ड स्नोडेन यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ब्रिटनच्या राजघराण्याचा बालवारस हाही या स्पर्धेत आहे.

नरेंद्र मोदी यांची निवड होताना टाईमच्या संपादकांनी त्यांचा जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतील सत्ताधारी पक्षाला पराभूत करण्याची क्षमता असणारा ‘हिंदू राष्ट्रवादी नेता’ असा गौरव केला आहे. मोदी यांना २,६५० मते मिळाली असून आणि ते या जनमत चाचणीत सर्वात आघाडीवर आहेत. मोदी यांना पडलेली मते एकूण मतांच्या २५ टक्के एवढी आहे. त्यांच्या खालोखाल स्नोडेनचा क्रमांक असून त्याला केवळ ७ टक्के मते आहेत.

यापूर्वी बराक ओबामा यांना हा मान दोन वेळा मिळाला होता. परंतु यंदा मात्र त्यांची लोकप्रियता घसरली असल्याचे दिसून आले आहे. सिरीयाचे अध्यक्ष बशर असद यांचाही नामांकन मिळालेल्या नेत्यांत समावेश आहे.