टाईमच्या पर्सन ऑफ द इअर साठी मोदीं स्पर्धेत

टाईम मासिकाकडून प्रसिद्ध केल्या जाणार्‍या पर्सन ऑफ द इअर २०१३ च्या यादीत गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला असून या साठी शिफारस केल्या गेलेल्या ४२ नामवंतात मोदी एकमेव भारतीय आहेत. टाईम मासिकाचे संपादक अंतिम निवड करणार असले तरी वाचकांनीही त्यांची मते ऑनलाईन पद्धतीने नोंदवायची आहेत.

या सन्मानासाठी निवडण्यात आलेल्या जगभरातील ४२ नावात मोदींबरोबरच जपानचे पंतप्रधान शिझो युबे, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, पाकिस्तानची शूर कन्या मलाला युसुफझाई, अॅमेझॉनचा सीइओ बेझोस, अमेरिकेच्या गुप्त वार्ता संस्थेची गुपिते चव्हाट्यावर आणणारा एडवर्ड स्नोडेन तसेच ब्रिटनचा नवजात युवराज जॉर्ज यांचाही समावेश आहे.

टाईमने मोदींची माहिती देताना वादग्रस्त हिदू राष्ट्रवादी आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व भारतातील गुजराथ राज्याचे मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख दिली असून जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात काँग्रेस कडून सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्नशील अशीही पुस्ती जोडली आहे. चांगल्या आणि वाईट दोन्ही दृष्टीने प्रभावशाली वाटणार्‍या व्यक्तींबाबत वाचकांनीही मतदान करावयाचे असून मोदींना आत्ताच २५ टक्के म्हणजे २६५० मते मिळाली आहेत. त्यांच्यापाठोपाठ एडवर्ड स्नोडेनचा नंबर असून त्याला ७ टक्के मते मिळाली आहेत असे समजते. ही मते २० नोव्हेंबर पर्यंत नोंदविलेली मते असून पर्सन ऑफ द इयरची घोषणा पुढच्या महिन्यात केली जाणार आहे.