बांग्ला देशात ५ जानेवारीला सार्वत्रिक निवडणूक

ढाका – बांग्ला देशात पाच जानेवारीला सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याची घोषणा सोमवारी देशाचे निवडणूक आयुक्त काझी रकीबुद्दीन यांनी रेडिओ आणि दूरदर्शनच्या माध्यमातून केली असून देशातील सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीत सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत २ डिसेंबर २०१३ ही आहे.

निवडणूक तारखांची घोषणा होताच ढाका व अन्य शहरांत हिंसाचार उसळण्याच्या भीतीने हजारो पोलिस व निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. विरोधी पक्ष बांग्ला देश नॅशनल पार्टीने निवडणुकां विरोधात मंगळवारपासून म्हणजे आजपासून ४८ तास रास्ता व रेल रोको आंदोलन सुरू केले असून निवडणूक वेळापत्रक अमान्य असल्याचे सांगितले आहे.

बांग्लादेशात सध्या काळजीवाहू सरकार असून त्यांचा शपथविधी सोमवारी पार पडला आहे. यात सहा मंत्री व दोन राज्यमंत्री समाविष्ट असून अवामी लिग पक्षाच्या नेत्या पंतप्रधान शेख हसीना यांनी अपक्ष सरकार स्थापावे अशी मागणी बांग्ला देश नॅशनल पार्टीच्या नेत्या व माजी पंतप्रधान खलिदा झिया यांनी केली आहे. त्यांच्या सोबत १७ अन्य सहयोगी पक्ष आहेत. अपक्ष सरकार नसेल तर निवडणूक निःपक्षपातीपणे होणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा खलिदा झिया यांनी दिला आहे.