तेजपाल यांची जामिनासाठी धडपड

नवी दिल्ली – आपल्या कनिष्ठ सहकारी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून वादाच्या भोवर्‍यात सापडलेले तेहलका डॉटकॉम या ऑन लाईन दैनिकाचे संपादक तरुण तेजपाल यांनी अटक टाळण्यासाठी धडपड सुरू केली असून दिल्ली उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मागणारा अर्ज केला आहे.

दरम्यान, या प्रकरणातील पीडित युवतीने आपल्यावरील या अत्याचाराच्या विरोधात न्याय मागण्याच्या बाबतीत सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये तेहलका डॉटकॉमच्या व्यवस्थापनाकडून आवश्यक ते सहकार्य मिळू शकत नसल्यामुळे आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.

दरम्यान, गोव्याच्या पोलिसांनी बेपत्ता झालेल्या तरुण तेजपाल यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू केले असून त्यांनी या दृष्टीने तेहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांची चौकशी सुरू केली आहे. या पोलिसांनी पीडित तरुणीचाही जबाब नोंदवला आहे.