‘त्या’ युवकांना माफ करू – सुशीलकुमार शिंदे

रांची – ज्या युवकांची हिंसाचाराचा मार्ग चोखाळण्यासाठी दिशाभूल करण्यात आली आहे, त्या युवकांना माफ करण्याची केंद्र सरकारची तयारी आहे, असे आश्‍वासन आज केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे दिले. रांची विद्यापीठाच्या 28 व्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. झारखंडमधील नक्षलवादी संघटनांकडे त्यांचे बोट होते. तथापि, कुठल्याही संघटनेचे नाव घेण्याचे त्यांनी टाळले.

शिंदे म्हणाले की, हिंसाचार हा कुठल्याही समस्येवरचा तोडगा नाही. आपल्यापैकी काही युवकांनी दिशाभूल करणार्‍या तत्त्वज्ञानाच्या प्रभावाखाली हिंसाचाराचा मार्ग चोखाळला आहे. मात्र, हे युवक आपल्यातीलच असून त्यांनी हिंसाचाराचा रस्ता सोडल्यास आम्ही त्यांना माफ करण्यास तयार आहोत, असे त्यांनी महात्मा गांधींजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा उल्लेख करत सांगितले.

केंद्र सरकार विविध योजनांद्वारे या दिशेने सातत्याने प्रयत्न करत आहे. समाजातील सर्व घटकांचा विकास व्हावा, यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे त्यांनी नमूद केले. शिक्षण, आरोग्य, रोजगार आदींमध्ये सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली. आपण जेव्हा विकासाबद्दल बोलतो तेव्हा केवळ जीडीपी वाढविण्यासंदर्भात उल्लेख करत नाही. देशातील सर्व नागरिकांना शिक्षण, वैद्यकीय सुविधा, दळणवळण, रोजगाराची संधी अशा सर्वसमावेशक विकासाबद्दल बोलतो, असेही त्यांनी नमूद केले.

युवावर्गाने पुढे येऊन जातीच्या भिंती तोडून समाजातील विघातक प्रवृत्तींचे निर्दालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले की, जीवनात वैफल्य आणि अपयशाचा प्रसंगी सामना करावा लागला तरी हा जीवनाचाच भाग आहे. भविष्यातील यशाच्या दिशेने नेणार्‍या या पायर्‍या आहेत, हे विसरू नये, असेही त्यांनी सांगितले.