नवी दिल्ली – पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना अटक करण्याचे आदेश राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिले आहेत. अनुसुचित जाती प्रवर्गातल्या एका व्यक्तीशी संबंधित प्रकरणात आयोगाच्या आदेशांचं उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यामुळे आयोगाने मुख्य सचिवांना पोळ यांना अटक करून आयोगापुढे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
आयोगापुढे विहीत काळात सादर होण्यास आयुक्त तयार असतील तर त्यांना 500 रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यास आयोगाने परवागनी दिली आहे. याबाकतची अधिक माहिती अशी की, गुलाबराव पोळ यांना अटक करून 28 जानेवारीपर्यंत दिल्लीच्या मानवाधिकार आयोगासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका लहान मुलाच्या मृत्यू प्रकरणी तपासात दिरंगाई केल्याचा आरोप गुलाबराव पोळ यांच्यावर आहे.
या प्रकरणी मानव अधिकार आयोगाच्या नागपूर कार्यालयानेही गुलाबराव पोळ यांना विचारणा केली होती. या विषयी रिपोर्ट सादर करण्यास सांगितलं होतं, मात्र गुलाबराव पोळ यांच्याकडून याबाबतील कोणतंही उत्तर आलं नव्हतं. हजर राहण्याचे आदेशही त्यानंतर गुलाबराव पोळ यांना देण्यात आले होते, मात्र गुलाबराव पोळ हे हजर झाले नाहीत. यानंतर दिल्लीच्या मानवाधिकार आयोगाने गुलाबराव पोळ यांच्या अटकेचे आदेश दिले आहेत.