भोपाळ/ऐजॉल- मध्यप्रदेश विधानसभेच्या २३० जागा आणि मिझोराममध्ये ४० जागांसाठी सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ११ वाजेपर्यंत सर्वत्र शांततेत मतदान सुरू होते. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी सकाळीच मतदान केले.
मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या २३० जागांसाठी मतदान होत आहे. राज्यातील ५१ जिल्ह्यांत ५३ हजार ९४६ मतदान केंद्रांवर चार कोटींहून अधिक मतदार एकूण दोन हजार ५८३ उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रांमध्ये बंद करणार आहेत. मध्यक प्रदेशचे मुख्यउमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यारसाठी ही निवडणूक अग्निपरिक्षा ठरणार आहे. शिवराज सिंह चौहान हे बुधनी आणि विदिशा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. भाजपचे शिवराजसिंह चौहान हॅटट्रिक करणार की काँग्रेस १० वर्षानंतर पुन्हा सत्ता काबीज करणार याकडे सर्वांची उत्सुकता लागली आहे.
मिझोराम विधानसभेच्या ४० जागांसाठी मतदान होत आहे. येथे १४२ उमेदवार रिंगणात आहेत. मुख्यमंत्री लालथनहावला यांच्यासह ११ विद्यमान मंत्री आपले नशीब पुन्हा अजमावत आहेत. या दोन्हील राज्यागतील निवडणूकीकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.