भोपाळ – मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (सोमवारी) मतदान होत आहे. राज्यात आजपर्यंत कुठल्याही एका पक्षाचे सरकार सलग दहा वर्षांपेक्षा अधिक काळ टिकलेले नाही. त्यामुळे, या निवडणुकीत बाजी मारल्यास भाजपकडून नव्या विक्रमाची नोंद होईल. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील सरकार गेली दहा वर्षे राज्यात सत्तेत आहे. चौहान सन 2005 मध्ये मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.
त्याआधी काँग्रेसचे तत्कालिन मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी सन 1993 ते 2003 या सलग दहा वर्षांच्या काळात मुख्यमंत्रिपद भूषविले होते. सन 2000 मध्ये मध्य प्रदेशचे विभाजन करण्यात येऊन छत्तीसगडची निर्मिती करण्यात आली. विभाजनपूर्व मध्य प्रदेशमध्ये बिगरकाँग्रेस सरकारला पाच वर्षांचा कार्यकाळ एकदाही पूर्ण करता आला नव्हता. मात्र, सन 2003 मध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीत बाजी मारली, त्याचप्रमाणे कार्यकाळही पूर्ण केला. त्यानंतर, सन 2008 मध्ये झालेल्या निवडणुकीतही भाजपने विजयाचा झेंडा रोवला. त्यामुळे, सलग दहा वर्षे सत्ता उपभोगणारे चौहान यंदाच्या निवडणुकीतही विजय मिळविण्याचा विश्वास व्यक्त करतात.
दहा वर्षांतील विकासकामाच्या जोरावर ते मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक साधण्याचे स्वप्न पाहत आहेत. काँग्रेसने मात्र, त्यांचा विकासाचा मुद्दा खोडून काढत राज्यात सामान्य व्यक्तीची अवस्था चांगली नसल्याचा दावा केला आहे. काँग्रेस आणि भाजपच्या प्रचारसभांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
दरम्यान, सोमवारी होणार्या निवडणुकीत चार कोटी 64 लाख 57 हजार 724 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
सुमारे दोन हजार 583 उमेदवारांचे भवितव्य ते निश्चित करतील. राज्यातील 51 जिल्ह्यांमधील 230 मतदारसंघांमध्ये 50 हजारांहून अधिक मतदानकेंद्रे उभारण्यात आली आहेत. शिवराज सिंह चौहान यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकार्यांची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे.