नवी दिल्ली – दिल्लीत महिलांविरुद्धच्या वाढत्या गुन्ह्यांबद्दल चिंता व्यक्त करत हे गुन्हे रोखण्यासाठी भाजपने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला कमांडो दल उभारण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे, दिल्लीत सत्तेवर आल्यास महिलांविरुद्धच्या अत्याचाराचे खटले त्वरेने निकाली काढण्यासाठी द्रुतगती न्यायालयांची उभारणी करण्याचे आश्वासनही पक्षाने दिले आहे.
पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी याबाबत बोलताना म्हणाले की, दिल्लीच्या विविध क्षेत्रांतील विकासाची महत्त्वाकांक्षी योजना पक्षाकडे आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात दिल्लीवर बलात्काराची राजधानी हा शिक्का बसला आहे तो पुसून टाकण्याची भाजपची इच्छा आहे. या समस्येचा सामना करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असेही त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयाबद्दलही त्यांनी विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना महागाईच्या मुद्यासह अनेक मुद्यांवरून सत्ताविरोधी लहरीचा सामना करावा लागत आहे. सन 1998 मध्ये कांद्याच्या वाढलेल्या भावामुळेच काँग्रेसला दिल्लीची सत्ता हस्तगत करता आली होती. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा भाजपवर परिणाम होत नसून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचाच या पक्षावर विश्वास नसेल तर लोक कसा विश्वास ठेवतील, असा सवालही त्यांनी केला. सर्वसामान्यांचा पक्ष म्हणविणार्या आपने करोडपती उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
पक्षाच्या एक उमेदवार शाझिया इल्मी यांनी आपली संपत्ती 32 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले आहे, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले. हा पक्ष काँग्रेसची बी-टीम असून काँग्रेस आणि त्या पक्षाचे खासदार संदीप दीक्षित यांच्याशी समन्वय राखत तो काम करत आहे, असेही ते म्हणाले. केजरीवाल यांनी आपल्याविरुद्ध केलेले सर्व आरोप खोटे सिद्ध झाल्याचा दावाही गडकरी यांनी केला. महिलांविरुद्धच्या अत्याचारासाठी पक्ष द्रुतगती न्यायालय उभारण्याचेही प्रयत्न करेल, असे गेली सुमारे 15 वर्षे दिल्लीत सत्तेपासून वंचित असलेल्या भाजपने म्हटले आहे.