टीम इंडिया मलिका विजयासाठी सज्ज

विशाखापट्टनम – विशाखापट्टनमध्ये रविवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा वनडे होत आहे. टीम इंडियाने आगामी काळात कमकुवत पाहुण्यांवर वर्चस्व गाजवताना मालिका विजयाचे लक्ष्य ठेवले आहे. त्या मुळे विशाखापट्टनमधील सामना जिंकण्याासाठी टीम इंडिया तयारी करीत आहे. पहिली वनडे गमावल्याने मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी वेस्ट इंडिजला दुसरा सामना जिंकणे क्रमप्राप्त आहे.

कसोटी मालिकेनंतरही विजयाचे सातत्य राखण्यात ढोणी आणि सहका-यांना वनडेतही यश आले आहे. कोचीतील पहिली वनडे ६ विकेट आणि ८८ चेंडू राखून जिंकत यजमानांनी या वर्षातील सलग पाचव्या जेतेपदाच्या दिशेने कूच केली. डावखुरा रवींद्र जडेजासह कामचलावू सुरेश रैना आणि ऑफस्पिर आर. अश्विनचा प्रभावी फिरकी मारा तसेच सलामीवीर रोहित शर्मा आणि ‘वनडाउन’ विराट कोहलीचे फलंदाजीतील सातत्य टीम इंडियाच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले.

कर्णधारपदाची धुरा डॅरेन सॅमीकडून ड्वायेन ब्राव्होकडे आली तरी पाहुण्यांची सांघिक कामगिरी उंचावत नाही. धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलवर त्यांची फलंदाजीची भिस्त होती. मात्र फॉर्मात नसलेला गेल पहिल्या वनडेत दुखापतग्रस्त झाला. परिणामी त्याच्या सहभागाबाबत साशंकता आहे.गेलच्या अनुपस्थितीत जॉन्सन चार्ल्स, डॅरेन ब्राव्हो आणि मार्लन सॅम्युअल्सकडून वेस्ट इंडिजकडून बहारदार फलंदाजी अपेक्षित आहे. वनडे संघात ऑफस्पिनर सुनील नारायण आणि तेज गोलंदाज रवी रामपॉलचा समावेश झाला तरी पाहुण्यांच्या गोलंदाजीत भेदकता दिसत नाही. पहिली वनडे गमावल्याने मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी वेस्ट इंडिजला दुसरा सामना जिंकणे क्रमप्राप्त आहे.