एक दिवसात २८ लाखावर खटले निकाली

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष पुढाकाराने काल देशभर हाती घेण्यात आलेल्या लोक अदालत उपक्रमामध्ये एकाच दिवसांत २८ लाख प्रलंबित खटले निकाली काढण्यात आले. देशातल्या विविध न्यायालयांमध्ये तीन कोटी खटले प्रलंबित आहेत. हा प्रलंबित खटल्यांचा भार कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पी. सत्शिवम् यांनी विशेष रस घेऊन हा उपक्रम आयोजिला होता.

सर्वोच्च न्यायालयापासून ते देशातल्या तालुकास्तरावरील न्यायालयापर्यंत सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण या संस्थेतर्ङ्गे हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. एका दिवसात ३९ खटले निकाली निघावेत, अशी अपेक्षा होती. परंतु सुमारे ११ लाख खटल्यातील वादी आणि प्रतिवादींनी आपले खटले या उपक्रमात निकाली न काढता न्यायालयाकडे परत पाठवावेत अशी मागणी केली. मात्र २८ लाख खटले निकाली निघाले.

दिल्लीत महानगर दंडाधिकार्‍यांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व स्तरावरील न्यायालयांमध्ये हा उपक्रम राबवला जाऊन ३ लाख ६६ हजार खटले निकाली निघाले. त्यासाठी ३०० न्यायालये स्थापन करण्यात आली होती. म्हणजे त्यांनी एका मिनिटाला तीन खटले निकाली काढले. सारख्याच प्रकारच्या खटल्यांचे गठ्ठे एकत्र करण्यात आले होते आणि सर्व वादी-प्रतिवादींना समोर उभे करून ते भराभर निकाली काढले जात होते.