पणजी – गोव्याची राजधानी पणजी येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ पत्रकार तरुण तेजपाल यांनी केलेल्या बलात्काराच्या प्रयत्नाचे प्रकरण ताजे असतानाच याच महोत्सवात दिल्लीहून आलेल्या एका विद्यार्थिनीने महोत्सवाच्या आयोजनातील एका ज्येष्ठ अधिकार्याने आपल्याशी जवळीक साधून शरीर संबंधास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला आहे.
सदर तरुणी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची विद्यार्थिनी असून एका चित्रपट संस्थेला मदत करण्याच्या कामासाठी म्हणून ती पणजीला आली आहे. या कामाच्या दरम्यान इंटरनॅशनल ङ्गिल्म ङ्गेस्टीव्हल ऑङ्ग इंडिया या संस्थेच्या सहसंचालक पदावर काम करणार्या अधिकार्याने आपल्याशी आक्षेपार्ह वर्तन केले असे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या विद्यार्थिनीने संचालक शंकर मोहन यांच्याकडे तक्रार दिली असून श्री. शंकर मोहन तिची चौकशी करत आहेत. संध्याकाळी आपण कार्यक्रम संपवून बाहेर पडत असता या अधिकार्याने आपल्याला दारू पिण्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले आणि ते देताना शराब भी पियेंगे और सबकुछ करेंगे असे म्हणून शरीरसंबंध सूचित केला आणि तत्पूर्वी अनेकदा आपल्याकडे बघून अश्लिल हालचाली आणि हावभाव केले. असेही तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी तीन वरिष्ठ अधिकार्यांची समिती कार्यरत झाली आहे.