जयपूर – राजस्थानातल्या अजमेर जिल्ह्यातील १५ वर्षीय वयाच्या एका मुलीचा ज्या आजोबाने ५५ वर्षे वयाच्या वृध्दाशी जबरदस्तीने विवाह लावून दिला असून या मुलीने सारथी या स्वयंसेवी संघटनेकडे धाव घेऊन जबरदस्तीने लावलेल्या विवाहातून मुक्त करावे अशी मागणी केली आहे. आपल्या विवाहासाठी आपल्या आजोबांनी आपल्या नवर्याकडून दोन लाख रुपये घेतले असल्याचा आरोप या मुलीने केला आहे.
या विवाहाला या मुलीने आणि तिच्या वडिलांनी विरोध केला परंतु तिच्या आजोबाने वडिलांना कोंेडून ठेवून जबरदस्तीने विवाहाचे विधी पार पाडले. त्यानंतर तिने आणि तिच्या वडिलांनी जात पंचायतीकडे धाव घेतली. परंतु जात पंचायतीनेही त्यांना न्याय दिला नाही. या विवाहातून मुक्त व्हायचे असेल तर या मुलीने आणि तिच्या वडिलांनी त्या ५५ वर्षे वयाच्या नवर्याला दहा लाख रुपये द्यावेत असा आदेश दिला. त्यामुळे त्यांचा निरुपाय झाला आणि त्यांनी पलायन केले.
सध्या ही मुलगी आणि तिचे वडील अज्ञात ठिकाणी आहेत. या अज्ञातवासात जाण्यापूर्वी त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांची दाद घेतली नाही. त्यांनी शेवटी सारथी या संघटनेचा आधार घेतला आहे. सारथी संघटनेच्या पदाधिकार्यांनी या विषयात लक्ष घातले असून या वृध्द नवर्याच्या विरोधात न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे.