नवी दिल्ली – लालू प्रसाद यादव यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात घडलेल्या चारा घोटाळ्यातील १ कोटी रुपये बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांनाही मिळाले होते. तशी कबुली या भ्रष्टाचाराचा सूत्रधार एस.बी. सिन्हा याने दिली असल्याची माहिती सीबीआयतर्ङ्गे झारखंड उच्च न्यायालयाला देण्यात आली. नितीशकुमार यांच्यासोबतच त्यांच्या जनता दल (यु) पक्षाचे प्रवक्ते शिवानंद तिवारी यांनाही ३५ ते ४० लाख रुपये दिल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे.
समाजवादी पार्टीचे नेते मिथिलेशकुमार सिंग यांनी झारखंड उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली असून चारा घोटाळा प्रकरणात नितीशकुमार यांचीही चौकशी करावी आणि त्यांच्या नावाचा समावेश या घोटाळ्यातल्या आरोपींच्या यादीत करावा अशी मागणी केली आहे. या याचिकेची सुनावणी सुरू असताना सीबीआयच्या वकिलांनी नितीशकुमार यांना पैसे मिळाले असल्याचे सांगितले.
नितीशकुमार यांना पैसे मिळाले असल्याची माहिती आता मिळत आहे. परंतु या प्रकारातले सगळे खटले आता निकाली निघाले आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाचा नव्याने समावेश करणे शक्य नसल्यामुळे त्यांचे नाव आता यादीत आलेले नाही. असे सीबीआयच्या वकिलांनी म्हटले. एवढेच नव्हे तर मिथिलेशकुमार सिंग यांची ही याचिका ङ्गेटाळून लावावी अशी मागणी केली. परंतु उच्च न्यायालयाने ही मागणी मान्य केली नाही आणि सीबीआयने १३ डिसेंबरपर्यंत या संबंधीचा आपला अहवाल सादर करावा असा आदेश दिला.