महाराष्ट्रात दलितांवरील अत्याचारात वाढ

मुंबई – महाराष्ट्रात दलितांवरील अत्याचारांच्या घटना वाढल्या असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑङ्ग इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी केला आहे. २०१३ साली त्यापूर्वीच्या वर्षापेक्षा अधिक अत्याचार झाले असल्याचे आठवले यांनी म्हटले आहे. २०१२ साली महाराष्ट्रात दलित अत्याचाराच्या १०८९ घटना घडल्या होत्या. मात्र २०१३ मध्ये ऑक्टोबर अखेर अशा १३६५ घटना घडल्या आहेत. या वाढलेल्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर रामदास आठवले यांनी काल गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेतली.

या भेटीच्यावेळी आर. आर. पाटील यांच्यासोबत अतिरिक्त पोलीस महासंचालक जावेद अहमद, गृहसचिव विनित अग्रवाल आणि अन्य काही वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर होते. राज्यामध्ये वाढत चाललेल्या या घटनांची दखल सरकारने घेतली आहे आणि अशा अत्याचाराच्या घटनातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे आश्‍वासन या सर्वांनी दिले.

दलितांवरील अत्याचाराच्या घटनांची नोंद ऍट्रॉसिटी ऍक्टखाली केली जाते. अशा तक्रारींची सुनावणी करण्यासाठी स्वतंत्र द्रुतगती न्यायालय नेमण्याचा विचार सरकार करत आहे असे आर. आर. पाटील यांनी सांगितले. आर. आर. पाटील यांनी राज्यातल्या सर्व तालुका आणि जिल्हा पोलीस कार्यालयांना दलितांवरील अत्याचाराच्या प्रकरणाची कठोरपणे दखल घ्यावी अशी सूचना पाठविली आहे.