मुंबई: सहा डिेसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन होत आहे. महापरिनिर्वाणदिन जवळ येऊ लागला, तसा विविध दलित संघटनांनी इंदू मिल जमीन हस्तांतरणाच्या आणि स्मारकाच्या प्रश्नावर वातावरण तापविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता आगामी काळात हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
राज्य सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी घोषित करण्यात आलेल्या इंदू मिलचा ताबा देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय कांबळे यांनी काही दिवसांपूर्वीच केला आहे.
इंदू मिलची जागा स्मारकासाठी देण्याचे ठरलेले असताना, केवळ राज्य सरकारच्या वेळ काढू धोरणामुळे अजूनही जमीन ताब्यात आलेली नाही. त्यामुळे शुक्रवारी समाज समता मंच आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह इंदू मिलमध्ये जावून जागेचा ताबा घेणार आहेत. राज्यभरातून १५ हजार कार्यकर्ते इंदू मिलबाहेर आंदोलन करतील असा दावा विजय कांबळे यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.