नवी दिल्ली – सीमांध्रा भागातील जनतेचा राग शांत करून तेलंगणाची निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारचे आटोकाट प्रयत्न जारी असतानाच केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने तेलंगण निर्मितीबाबत सरकारला सबुरीचा इशारा दिला आहे. तेलंगण निर्मिती केल्यास सीमांध्रा भागामध्ये कायदा-सुव्यवस्थेचे नवे प्रश्न निर्माण होतील, असे गुप्तचर यंत्रणेने म्हटले आहे.
इंटेलिजन्स ब्यूरोचे प्रमुख असीङ्ग इब्राहिम यांनी देशातल्या विविध राज्यातील पोलीस महासंचालकांच्या परिषदेसमोर भाषण करतानाही या गोष्टीचा पुनरुच्चार केला. आंध्राचे विभाजन केल्यास सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांवर प्रचंड ताण पडेल, असे ते म्हणाले. केवळ आंध्र प्रदेशच नव्हे तर पूर्ण देशभरच सध्या सुरक्षा दलांवर मोठा ताण पडलेला आहे असे ते म्हणाले.
केंद्र सरकार तेलंगण निर्मितीच्या वैधानिक उपचारांसाठी पूर्व तयारी करायला लागलेले आहे. हे उपचार सुरळीतपणे पार पडावेत यासाठी केंद्र सरकारची मंत्रिमंडळ समिती कार्यरत आहे आणि येत्या २७ नोव्हेंबरला तिला आपला अहवाल सादर करावायाचा आहे. अशा स्थितीतच गुप्तचर यंत्रणेचा हा इशारा समोर आलेला आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी सरकारला असा इशारा दिलेला आहेच. तेलंगण निर्मिती केल्यास राज्यातले माओवादी सक्रीय होऊन मोठा हिंसाचार घडवतील, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलेले आहे.