लडाखमध्ये जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प

श्रीनगर – केंद्र सरकार केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प थंड वाळवंट आणि जगाचे छप्पर म्हणून ओळखल्या जाणार्‍या लडाख भागात उभारणार असून या प्रकल्पातून ५ हजार मेगावॉट वीजनिर्मिती होऊ शकणार आहे. या प्रकल्पासाठी किमान २० हजार एकर जागा आवश्यक आहे आणि त्यासाठी जागा निश्चित करण्यास सुरवात झाली असल्याचे समजते.

Ladakh-solar-power

(फोटो सौजन्य -Swarajya)
भारतातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प राजस्थानात आकारास आला आहे. तेथील प्रकल्पाची क्षमता ४ हजार मेगावॉटची आहे. लडाख हा ११५६२ फूट उंचीचा प्रदेश जम्मू काश्मीर राज्याचा भाग आहे. लेहचे जिल्हाविकासाधिकारी सिमरनदीपसिंग म्हणाले की येथे अपारंपारिक उर्जा मंत्रालयातर्फे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आला असून आम्ही त्यासाठी आवश्यक जागेचा शोध घेत आहोत. १ महिन्यात जागा निश्चित केली जाईल व त्यानंतर प्रकल्प उभारणीचे काम सुरू होईल असा अंदाज आहे. एकदा हा प्रकल्प कार्यान्वित झाला की जम्मू काश्मीर राज्याची वीजेची स्थानिक गरज भागेलच पण आम्हाला अन्य राज्यांना वीज विकताही येईल.
Ladakh-solar-power1
अर्थात हा भाग पहाडी आहे पण येथील हवामान कोरडे असल्याने सौर ऊर्जेसाठी योग्य आहे. मात्र समुद्रसपाटीपासूनची उंची आणि हवामानातील बदल यामुळे हा प्रकल्प उभा राहण्यास नक्की किती काळ जाईल हे सांगणे अवघड आहे असेही सिग म्हणाले.