दिल्लीत भाजप-कॉग्रेसमध्ये काट्याची टक्कर

नवी दिल्ली – निवडणूकीच्या पूर्वी दिल्लीमध्ये विविध स्रोतांकडून मिळालेल्या अहवालामुळे कॉँग्रेस सतर्क झाली आहे. कॉँग्रेस व भाजपने अनेक जागांवर एकमेकांना जोरदार आव्हान उभे केले आहे. काही दिवसांपासून कॉँग्रेसने चौथ्या टर्मसाठी प्रचारात जोर लावला आहे. भाजपलाही निवडणूक फीडबॅकमधून एकतर्फी आघाडी मिळण्याचे संकेत नाहीत. त्या मुळे दोन्ही पक्षांना आमने-सामने उभारावे लागणार आहे. मतदारसंघनिहाय चित्र स्पष्ट झाले असून त्यानुसार भाजप व कॉँग्रेसमध्ये काट्याची टक्कर आहे.

या निवडणूकीसाठी दोन्ही पक्ष आपच्या अस्तित्वाबाबत संभ्रमावस्थेत आहेत. आपही मोठी आशा बाळगून आहे. बसपाने चार-पाच जागांवर कॉँग्रेस-भाजपसाठी डोकेदुखी निर्माण केली आहे. जवळपास डझनभर जागांवर तिरंगी लढत होईल, असा कयास दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा आहे. आप व बसपा कोणाची मते खाणार याचा अंदाज भाजप कॉँग्रेसच्या नेत्यांना सध्यातरी नाही.

दोन्ही पक्षांना प्राप्त झालेल्या अंतर्गत अहवालानुसार हे विश्लेषण करण्यात आले आहे. चौथ्या टर्मसाठी निवडणूक लढवणार्याल शीला दीक्षित यांना नवी दिल्ली मतदारसंघात तिरंगी लढतीचा सामना करावा लागत आहे. आप आणि भाजपमधील मतभेदाचा फायदा मुख्यमंत्र्यांना मिळू शकेल, असा कॉँग्रेस पक्षाचा अहवाल आहे. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार हर्षवर्धन कृष्णानगर मतदारसंघात कॉँग्रेस उमेदवाराच्या तुलनेत मजबूत स्थितीत असल्याचे सांगण्यात येते. पटपडगंजमध्ये केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने दोन्ही राष्ट्रीय पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी मनीष सिसोदिया येथून निवडणूक लढवत आहेत. बसपाला गेल्या निवडणुकीत दोन जागा मिळाल्या होत्या.

राहुल गांधी यांच्या सभेला ज्या आंबेडकरनगरात कमी गर्दी जमा झाली होती, तिथे आणि संगम विहारमध्ये कॉँग्रेससाठी फार समाधानकारक वातावरण नाही. पक्ष यात सुधारणा करण्याच्या प्रयत्नात आहे. कॉँग्रेसचे दिग्गज नेते चौधरी प्रेमसिंह व सज्जन कुमार यांचा हा भाग आहे. संगम विहारमधून जगप्रवेश कुमार तर आंबेडकरनगरमधून स्वत: प्रेमसिंह मैदानात आहेत. राहुल यांच्या मंगोलपुरीमधील सभेसाठी मतदारांची विशेष गर्दी नव्हती. त्यामुळे कॉग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे.