हैदराबाद – नुकत्याच झालेल्या ङ्गायलीन वादळातून सावरत असलेल्या आंध्र प्रदेशाला हेलेन या नव्या वादळाचा धोका निर्माण झाला असून आंध्र प्रदेशातील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा या वादळाला तोंड देण्यासाठी सिद्ध होत आहेत. ङ्गायलीन वादळाचा तडाखा आंध्र प्रदेशाच्या ईशान्य भागातील श्रीकाकुलम्ला मोठ्या प्रमाणावर बसला होता. आता येणार्या हेलेन वादळाचा तडाखा दक्षिण भागातील नेल्लोर जिल्ह्यातल्या कवाली या गावाला बसण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने या संबंधात इशारा देणारा संदेश जारी केला आहे. हे वादळ कवालीच्या पूर्वेला ४२० कि.मी.वर केंद्रिभूत झालेले आहे. हे ठिकाण चेन्नईपासून ४७० कि.मी. ईशान्येला समुद्रात आहे. हे वादळ अधिक तीव्र बनून पुढे वाटचाल करत आहे आणि ते उद्या म्हणजे शुक्रवारी श्रीहरीकोटा आणि ओंगोले या शहरांजवळून कवालीकडे वाटचाल करेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
या वादळाचा परिणाम म्हणून ८५ ते ९५ कि.मी. प्रती तास अशा वेगाने वारे वहायला लागतील आणि हा वेग १२० कि.मी. पर्यंत सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. या वादळाचा परिणाम म्हणून आंध्र प्रदेशाच्या दक्षिण भागात आणि तामिळनाडूच्या पूर्व भागात जोरदार ते अती जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वादळामुळे नेल्लोर, प्रकाशम्, गुंटूर आणि कृष्णा या जिल्ह्यातील समुद्र किनार्यावर दीड मीटर उंचीच्या लाटा उसळतील.