राहुल गांधी विशयी पुन्हा भाजपची तक्रार

नवी दिल्ली- काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी निवडणुक प्रचार सभांमध्ये आम्हाला सारखे चोर आणि लुटारू म्हणतात. त्यांची ही वक्तव्ये आचारसंहितेला धरून नसल्याने काँग्रेसची राजकीय पक्ष म्हणूनच मान्यता काढून घ्यावी अशी मागणी करणारे निवेदन भाजपच्यावतीने आज निवडणुक आयोगाकडे सादर करण्यात आले आहे.

भाजपचे एक शिष्टमंडळच आज निवडणुक आयोगाच्या कार्यालयात गेले होते. मुख्तार अब्बास नक्वी यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाने आयोगाला जे निवेदन सादर केले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की 16 नोव्हेंबरला छत्तीसगड मध्ये घेतलेल्या जाहीरसभेत राहुल गांधी यांनी राज्यातील भाजपचे सरकार चोर आणि लुटेरे लोकांचे सरकार असल्याचे म्हटले होते. 17 नोव्हेंबरला त्यांनी दिल्लीत एक सभा घेऊन भाजपने कर्नाटक आणि महाराष्ट्रात सामाजिक तणाव वाढवण्याचे काम केल्याचाही त्यांनी आरोप केला होता.

राहुल गांधी यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यांविषयी स्वताला दूर ठेवण्या ऐवजी काँग्रेस पक्षाने त्यांच्या आरोपांचीच री ओढली आहे.छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल आणि अन्य नेते ठार झाले आहेत. या घटनेबद्दलही काँग्रेसचे लोक भाजपला जबाबदार धरून खोटे आरोप करीत आहेत अशी तक्रारही भाजपने केली आहे.

मध्यप्रदेशात काँग्रेसने केलेल्या एका जाहीरातींवरही भाजपने आक्षेप घेतला आहे. मोदींचा उल्लेख या जाहीरातीत फेकू असा करण्यात आला होता. या फेकुची सभा ऐका त्याचा आनंद घ्या पण मत मात्र काँग्रेसलाच द्या अशी जाहीरात काँग्रेसने केली होती. या जाहीरातींची कात्रणे निवडणुक आयोगाला देण्यात आलेल्या निवेदनात जोडण्यात आली आहेत.या सार्‍या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधी यांच्यावर कठोर कारवाई करून काँग्रेसची मान्यताच तातडीने रद्द करावी अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली.