अती श्रीमंतांच्या यादीत २० भारतीय उद्योजक

न्यूयॉर्क – भारतातल्या १०० श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये यावर्षी २० नव्या उद्योजकांनी स्थान पटकावले आहे. या २० औद्योगिक घराण्यांची एकूण मालमत्ता ५५ अब्ज डॉलर्स एवढी आहे. अमेरिकेतील ङ्गोर्बस् मासिकातर्ङ्गे अशी यादी प्रसिद्ध केली जात असते. या यादीतून २० लोक खाली गेले असून नव्या २० जणांनी या यादीत शिरकाव केला आहे. त्यांची मालमत्ता वाढल्यामुळे त्यांना या यादीत स्थान मिळाले आहे.

देशातल्या श्रीमंत टॉप टेन मध्ये यावेळी हिंदुजा ब्रदर्स, अदि गोदरेज आणि सुनील मित्तल या तिघांनी स्थान मिळविले आहेत. या तिघांचे क्रमांक पूर्वी दहाच्या खाली होते. पण आता हिंदुजा ब्रदर्सनी सहावे स्थान, अदि गोदरेज आणि त्यांच्या कुटुंबाने आठवे स्थान आणि सुनील मित्तल यांनी दहावे स्थान पटकावले आहे. हिंदुजा ब्रदर्स यांची मालमत्ता ९ अब्ज डॉलर्स, अदि गोदरेज यांची मालमत्ता ८.३ अब्ज डॉलर्स आणि सुनील मित्तल यांची मालमत्ता ६.६ अब्ज डॉलर्स एवढी आहे.

भारतातल्या श्रीमंतांच्या यादीमध्ये गेल्या सहा वर्षांपासून मुकेश अंबानी सतत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची मालमत्ता २१ अब्ज डॉलर्सची आहे. त्यांचे कनिष्ठ बंधू अनिल अंबानी यांची मालमत्ता ६.२ अब्ज डॉलर्स एवढी असून त्यांचा क्रमांक अकरावा आहे.