एटीएममध्ये शस्त्राचा धाक दाखवून महिलेची लूट

बंगलोर – एटीएमध्ये घुसून एका महिलेवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रकार आज बंगलोर शहरात घडला आहे. अतिशय भयानक अशा या घटनेत महिलेवर कोयत्याने वार करण्यात आले. हा सगळा प्रकार एटीएममधल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी एक महिला एटीएममध्ये आली. त्यावेळी तिच्या मागून पाठलाग करत एक व्यक्ती आला आणि त्याने एटीएमचा दरवाजा बंद केला. त्यानंतर त्याने महिलेकडे पैशांची मागणी केली. महिलेने त्याला विरोध केल्याने त्याने पिस्तूल आणि कोयत्याचा धाकही दाखवला.

धाक दाखवल्यानेही बधत नसल्याने त्या व्यक्तीने कोयत्याने महिलेच्या डोक्यावर वार केले. यात ही महिला जखमी गंभीर जखमी झाली आहे. शहराच्या मध्यवस्ती भागात ही घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.