केजरीवाल यांच्या निधीबद्दल अण्णा हजारेंना शंका

नवी दिल्ली – अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टीच्या प्रचार कार्यासाठी वापरत असलेल्या पैशावर अण्णा हजारे यांनी शंका उपस्थित केली असून हे पैसे लोकपाल विधेयक मोहिमेसाठी जमवलेल्या निधीचे तर नाहीत ना, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. अण्णा हजारे यांनी या संबंधात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात अरविंद केजरीवाल अजूनही निधी जमा करत आहेत का, असा प्रश्‍न विचारून केजरीवाल यांच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे.

अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी एकत्रित आंदोलन केले होते. परंतु आपली ही मागणी पुढे रेटण्यासाठी वेगळा राजकीय पक्ष काढावा की नाही, या मुद्यावरून या दोघात मतभेद निर्माण झाले. स्वतंत्र राजकीय पक्ष काढण्यास अण्णा हजारे यांचा विरोध होता, मात्र तो विरोध डावलून अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी स्थापन केली. त्यामुळे या दोघांमध्ये प्रचंड मतभेद निर्माण झाले.

अरविंद केजरीवाल यांनी घराघरात ङ्गिरून निधी गोळा केलेला आहे, परंतु अण्णा हजारे यांना केजरीवाल यांच्या निधीच्या स्रोताबद्दल शंका आहे. अरविंद केजरीवाल मात्र पारदर्शकतेचा दावा करत आहेत. अण्णा हजारे यांनी आपल्या निधीची आणि खर्चाची कोणाकडूनही चौकशी करावी, तिच्यात काही दोष आढळला तर आपण आपली उमेदवारी मागे घेऊ आणि अण्णांना मात्र आपल्या पक्षाचा प्रचार करावा लागेल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

जनलोकपाल विधेयक आंदोलनासाठी जमा केलेला पैसा वेगळा होता आणि तो त्याच आंदोलनात खर्च झालेला आहे. त्या निधीतला एकही पैसा आम आदमी पार्टीच्या प्रचारासाठी खर्च केला जात नाही, असा खुलासा केजरीवाल यांनी केला आहेच; पण जनलोकपाल विधेयक आंदोलनासाठी आपण जमा केलेल्या आणि खर्च केलेल्या हिशोबाचा तपशील लिहून काढून तोे अण्णा हजारे यांच्याकडे पाठवून दिला आहे.