ठाणे- मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबवण्यासाठी महिनाभरात अधिसूचना जारी करण्यात येणार असून, प्रथम मुंबईत आणि त्यानंतर नवी मुंबई व नंतर ठाणे अशा क्रमाने ही योजना लागून करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी येथे केली. ठाणे व इतर शहरांतील बेकायदा इमारतींचा क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे ते म्हणाले.
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या कापूरबावडी उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या वेळी ते म्हणाले की, मुंबईनंतर ठाणे हे सर्वात विकसित होणारे शहर आहे. या शहरात अनेक बेकायदा बांधकामे झालेली आहेत. मात्र एकाच इमारतीच्या विकासाला प्राधान्य न देता समूह विकासावर भर देण्यात येणार आहे. हा विकास करण्यासाठी जमीन एकत्र करणे, सर्वाची मान्यता मिळवणे, सरकारी जमिनीवर सामूहिक विकास करण्याबाबतच्या अडचणी येत होत्या. त्या दृष्टीने गांभीर्याने विचारही करण्यात आला. त्याची सुरुवात मुंबईतून करणार असून, टप्प्याटप्प्याने नवी मुंबई व ठाण्यातही ही योजना लागू करण्यात येणार आहे.
या प्रसंगी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित, एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान, खासदार संजीव नाईक, सुरेश टावरे, आमदार जितेंद्र आव्हाड व निरंजन डावखरे, पोलिस आयुक्त के. पी. रघुवंशी, महापालिका आयुक्त असीमकुमार गुप्ता, जिल्हाधिकारी पी. वेलरासू आदी उपस्थित होते.
ठाण्याच्या विकासाच्या दृष्टीने पायाभूत प्रकल्पासाठी अनेक योजनांना मान्यता देण्यात आली आहे. एमएमआरडीए क्षेत्रातील शहरासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात चार हजार 28 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ठाणे शहरात 10 ठिकाणी फूट ओव्हर ब्रीज बांधण्यात येणार आहेत. तसेच पंधराशे कोटींची कामे प्रस्तावित असून त्यात 231 किमी रस्ते, चार उड्डाणपूल, दोन रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.