संसदेत जाण्यायेण्यावर इम्रान खान यांनी खर्च केले ५५ कोटी रुपये

पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून हटविले गेल्यानंतर इम्रान खान यांच्या एक एक करामती समोर येऊ लागल्या आहेत. परदेशी नेत्यांनी दिलेल्या विविध महागड्या गिफ्ट विकून त्यांचे पैसे करण्याचा प्रकार उघड झाल्यापाठोपाठ आता ३ वर्षे आठ महिन्याच्या कारकिर्दीत इम्रान खान यांनी संसदेत येण्याजाण्यासाठी तब्बल ५५ कोटी रुपये खर्च केले आहेत. नवे अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी हा खुलासा केला आहे.

इम्रान खान पंतप्रधान झाल्यावर पंतप्रधान निवासस्थान वापरत नव्हते तर ते स्वतःच्या घरात राहत होते. बानी गाला मध्ये असलेल्या या घरातून संसदेत येताना इम्रान खान हेलिकॉप्टरचा वापर करत असत. त्यावरून सत्तेवर आल्यापासूनच इम्रान यांच्यावर टीका होत होती. पण तत्कालीन माहिती प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी हेलिकॉप्टरचा खर्च प्रतीकिलोमीटर ५५ रुपये असल्याचे त्यावेळी सांगितले होते पण प्रत्यक्षात या प्रवासावर ५५ कोटींपेक्षा अधिक खर्च केला गेल्याचे दिसून आले आहे.

इम्रान खान यांनी देशावर कर्जाचा डोंगर उभा केला आहे. वीज कर्ज २५०० अब्जावर तर नैसर्गिक वायू कर्ज १५०० अब्जांवर गेले आहे. इसालामाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी देशाचे उपअॅटर्नी जनरल अर्षद कयानी यांना पाक सूचना आयोगाच्या आदेशावर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असून इमरान यांनी ऑगस्ट २०१८ ला पदभार स्वीकारल्यावर अनेक देश प्रमुखांकडून मिळालेल्या गिफ्टची माहिती सार्वजनिक करण्यात यावी असे म्हटले आहे.