लातूर- निवडणुका आपल्या समोर आल्या आहेत, त्याचबरोबर नविन नेतेही आले आहेत. ते गुडघ्याला बाशिंग बांधुन देशात फिरत आहेत. पण हा प्रयोग यशस्वी होणार नाही, अशी चौफेर टिका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांचे नाव न घेता केली.
काँगेसच्या वचनपुर्ती जनजागरण यात्रेचा शुभारंभ करताना आंबेडकर पार्कवरील सभेत मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेश काँगेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे हे होते. केंद्रात व राज्यात भाजपला सत्ता मिळाली होती. गेल्या 15 वर्षापासून राज्यात काँगेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. केंद्रातही गेल्या 10 वर्षापासून संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार कार्यरत असून 2004 च्या निवडणुकीत भाजपला दिल्लीतून हद्दपार केले तर 1999 मध्ये राज्यातील सत्तेवरुन युतीला खाली खेचले. तेंव्हापासून भाजपचे नविनविन प्रयोग चालू आहेत ते यशस्वी होणार नाहीत व 2014 मध्येही काँग्रेसचीच सत्ता येणार, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
भाजपने ज्यांना पुढे केले आहे ते गुडघ्याला बाशिंग बांधुन देश फिरत आहेत. अपशब्द व शिव्या याशिवाय ते कांहीच करत नाहीत. त्यांच्याकडे परराष्ट्र धोरण नाही, शेतकर्याचे प्रश्न नाहीत, देशाची आर्थिक निती माहित नाही त्यामुळे ते याविषयावर कांहीच बोलत नाहीत, अशी टिका मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली.
केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने मागील काळात देशातील शेतकर्याचे 70 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. देशभरात रस्ता बांधणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून पायाभूत कार्यक्रमाला गती देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातही गेल्या 14 वर्षात विकासाचा पाया भक्कम रचला आहे. केंद्र सरकारची अन्न सुरक्षा योजना येवू घातली आहे. त्याचा लाभ या देशातील 95 टक्के जनतेला येणार असून आता उपासपोटी कोणीही झोपणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिली.