पंचगंगा नदीचा घाट पणत्यांनी उजळला

कोल्हापूर – त्रिपुरारी पोर्णिमेच्या निमित्ताने रविवारी पहाटे कोल्हापूरातील पंचगंगा नदी घाट परिसर हजारो पणत्यांनी उजळून निघाला. याठिकाणी गेल्याा काही दिवसांपासून बोचरी थंडी असतानाही हजारो मिणमिळत्या पणत्यांचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापूरकरांनी पंचगंगा घाटावर मोठी गर्दी केली होती. येथील विवीध सामाजिक सेवा संस्था आणि नागरीकांच्या वतीने दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदी घाटावर हजारो पणत्या प्रज्वलित करुन आनंद साजरा केला जातो.

रविवारी पहाटे कोल्हापूरकर आवर्जुन पंचगंगा घाट परीसरात दाखल झाले होते. सुरवातीला पंचगंगा घाट परिसरामध्ये आकर्षक आणि मनमोहक अशा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यामध्ये कोल्हापूरच्या विवीध प्रश्नांवर काढलेल्या रांगोळ्यांनी संपूर्ण कोल्हापूरकराचे लक्ष वेधून घेणा-या होत्या. त्यानंतर प्रत्येक जण एक एक पणती प्रज्वलित करत पंचगंगा घाट परिसर पन्नास हजारांहून अधिक पणत्यांनी उजळून टाकला.

यावेळी शहरातील वृद्ध, तरुण, महिला आणि लहान मुलांच्या सहभाग होता. हजारो पणत्यांचे प्रज्वलन झालेले दृष्य मनाला मोहीत करणारे असे होते. याचवेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यामुळे दिपोत्सोवाला आणखी रंगत आली होती.